‘मेट्रो ३’साठीचे (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड आरेतच होणार अशी भूमिका नव्या सरकारने घेतली आहे. मात्र मुंबईच्या फुफ्फुसावर सरकारला घाव घालू देणार नाही, असे ठाम मत व्यक्त करत पर्यावरणप्रेमींनी ‘आरे वाचवा’ची हाक दिली आहे. त्यानुसार आरेत निदर्शने करण्यात येत आहेत. या आंदोलनाला विविध सामाजिक संस्थांसह सामान्यांचा प्रतिसाद मिळत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.

“सर्वोच्च न्यायालयाने परवानगी देऊन प्रकल्प सुरु झाला आहे. झाडे कापली आहेत आणि २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता झाडे कापण्याची आवश्यकता नाही. त्या ठिकाणी काम सुरु केले तर पुढच्या एक वर्षामध्ये काम पूर्ण होऊन मेट्रो सुरु होऊ शकते. सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात लिहिले आहे की, सगळी झाडे मिळून त्यांच्या संपूर्ण आयुष्यात जेवढा कार्बन डायऑक्साइड घेतील तेवढेच मेट्रो ८० दिवसांच्या फेऱ्यामधून पूर्ण करेल. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिली होती. आता नव्याने झाडे कापण्याची आवश्यकता नाही हे सगळ्यांना माहिती आहे. तरीही आंदोलन होत आहे. काही पर्यावरणवाद्यांना हे माहिती नसल्यामुळे आंदोलन करत असतील. तर काहींचे आंदोलन हे छद्म पर्यावरणवादी बनून पुरस्कृत असण्याची शक्यता आहे. सर्व पर्यावरणवाद्यांचा आदर राखून त्यांच्यासोबत चर्चा करु,” असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

“मेट्रो हा मुंबईचा अधिकार आहे. मेट्रो नसल्यामुळे मुंबई रोज प्रदुषणामुळे होरपळत आहे. हे पाप आम्ही जास्त वेळ चालू देणार नाही. कांजुरला कारशेड नेले तर तिथे चार वर्षे बांधकामाला लागतील आणि खर्च वाढेल. त्यामुळे आता मुंबईकरांना मेट्रो लवकर मिळण्याकरता पर्यावरणपूरक निर्णय घेणार आहोत,” असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“नव्याने जंगल उभारलेल्या जागेच्या बाहेर कशाप्रकारे बांधकाम करता येईल असा प्रयत्न आहे. त्याच्यासंदर्भात काम सुरु आहे. पर्यावरणाचे मुद्दे घेऊन पर्यावरवादी हायकोर्टात गेले आणि तिथे हरले. सुप्रीम कोर्टातही हरले. सुप्रीम कोर्टाच्या परवानगीनंतर २५ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता या प्रकल्पाला थांबवणे चुकीचे आहे,” असे उपमुख्यमंत्री म्हणाले.