पुणे पोर्श कार अपघात प्रकरणावर बोलताना राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणीसांना लक्ष्य केलं होतं. याप्रकरणी देवेंद्र फडणवीसांचा राजीनामा का मागू नये? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. दरम्यान, अनिल देशमुखांच्या टीकेवर आता देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – देवेंद्र फडणवीसांचे मतदारांना खुले पत्र, “लोकशाहीच्या उत्सवात मतदारांच्या मनामनात मोदी, ४ जूननंतर..”

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अनिल देशमुख यांच्या टीकेबाबत विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, “ज्यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचे आरोप आहेत, त्यांच्याविषयी मला का विचारता?” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

राहुल गांधींनाही दिलं प्रत्युत्तर

पुढे बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं. निबंध लिहिणे हाच नियम असेल तर ट्रक, बस. उबर, ओला, ऑटोरिक्षा किंवा टॅक्सी चालकाने अपघात केला तर त्याला तुम्ही निबंध लिहायला का लावत नाही? अशी टीका राहुल गांधी यांनी केली होती. यासंदर्भात बोलताना एखाद्या गंभीर घटनेचं राजकारण करणं हे राहुल गांधींसारख्या व्यक्तीला शोभत नाही, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं. तसेच “पुण्यातील अपघात प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली असून यासंदर्भातील निर्णय बाल हक्क न्यायालयाने घेतला होता. त्यावर अपील करून पोलिसांनी हे प्रकरणी पुन्हा बाल हक्क न्यायालयात आणले आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचा – Pune Porsche Accident: पोर्श धडक प्रकरणी फडणवीसांची प्रतिक्रिया, “कुणालाही सोडणार नाही, स्वातंत्र्याचा…”

अनिल देशमुखांनी नेमकं काय म्हटलं होतं?

दरम्यान, पोर्श कार अपघातासंदर्भात एक्स या समाज माध्यमावर पोस्ट करत अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली होती. “देवेंद्र फडणवीस, काही दिवसांपूर्वीच तुम्ही म्हणाला होतात की गाडीखाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील. आज गरिबा घरची दोन लेकरं धनदांडग्याच्या गाडी खाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव घेणाऱ्या हैवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले, दहा तासात जामीन करून दिला, तो पण रविवारी”, असं अनिल देशमुख म्हणाले होते. तसेच देवेंद्रजी आता तुम्हीच सांगा आम्ही गृहमंत्र्यांचा राजीनामा का नाही मागायचा? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता.