विरोधी पक्षनेते दवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कारभारात मोठ्या भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करत विशेष कॅग ऑडिटची मागणी केलीय. बीएमसीची (BMC) स्थायी समिती बैठक ऑनलाइन घेऊन भाजपा नेत्यांना म्यूट केलं जातं. करोनाचा बहाना करून भाजपाच्या नेत्यांना बोलू द्यायचं नाही, असाच कारभार सुरू असल्याचा आरोप फडणवीसांनी केला.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, “खरंतर महानगरपालिकेत जो भ्रष्टाचार, दुराचार, अनाचार पहायला मिळतो आहे तो महाराष्ट्रातच काय देशातही कुठे इतका भ्रष्टाचार घडला असेल असं मला वाटतं नाही. अक्षरशः आपण ज्याला निर्लज्जता म्हणतो तसा निर्लज्जतेने भ्रष्टाचार होतोय. मी गेले वर्ष दीड वर्ष पाहतोय करोनाचा बहाना करून भाजपाच्या नेत्यांनी बोलू दिलं जात नाही.”
“भाजपाच्या नेत्यांना म्यूट करून आपला मनमानी कारभार”
“महानगरपालिकेची स्थायी समिती बैठक जाणीवपूर्वक ऑनलाईन घेतली जाते आणि भाजपाच्या नेत्यांना म्यूट करून आपला मनमानी कारभार चालवला जात आहे. या संपूर्ण करोनाच्या काळात महानगरपालिकेने करोनाशी संबंधित जे निर्णय घेतले त्या निर्णयांवर आज प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे,” असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
“विशेष कॅग ऑडिटशिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही”
“जिथं काँक्रिट रोड आहे तिथं डांबरी रोडचा ठेका दिलेला आहे. जेथे चांगला डांबरी रोड आहे त्या ठिकाणी पुन्हा रस्ता बनवण्याचं कंत्राट देण्यात आलाय. विशेष कॅग ऑडिटशिवाय हा भ्रष्टाचार लोकांना समजणार नाही,” असं म्हणत फडणवीस यांनी महानगरपालिकेच्या खर्चाचं स्पेशल कॅग ऑडिट करण्याची मागणी केली.