Devendra Fadnavis महापालिका निवडणुकीचं रणमैदान जवळ आलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे हिंदी सक्ती विरोधातल्या मोर्चातही एकत्र येणार आहेत. मराठी माणसाच्या हितासाठी आणि मराठीसाठी आम्ही दोघं एकत्र येऊ शकतो असं दोघांनीही म्हटलं होतं. या दोघांची युती होऊ शकते आणि तसं झाल्यास महायुतीला ही निवडणूक जड जाऊ शकते असंही काही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे. दरम्यान ते मराठी असतील तर मी काय पंजाबी आहे का? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

राज ठाकरेंना बरोबर घेणार का?

आत्ता तरी आमची युती भाजपा, शिवसेना ओरिजनल, राष्ट्रवादी ओरिजनल अशीच आमची युती आहे. या व्यतिरिक्त कुणी आमच्याबरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करु. पण आम्ही असा काही निर्णय घेतलेला नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले तर ठाकरे बंधूंबाबतही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं.

Uddhav Thackery and Raj Thakceray
उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे खरंच एकत्र येतील का? (फोटो-प्राजक्ता राणे, ग्राफिक्स टीम, लोकसत्ता)

ते मराठी आहेत तर मग मी काय पंजाबी आहे का?

ठाकरे बंधूंचं एकत्र येणं आणि मुंबई हे महाराष्ट्राचं कुरुक्षेत्र ठरलं आहे का? असं विचारलं असता देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ते मराठी आहेत तर मी कुठे पंजाबी आहे? मी कुठे गुजरातीच आहे? मी पण मराठीच आहे. माझ्या पक्षाचा मुंबईचा अध्यक्ष आशिष शेलार आहे. तो कुठे आंध्र प्रदेश किंवा गुजरातहून आला आहे? त्यामुळे मराठी मतांची कुणाचीही मक्तेदारी नाही. आम्ही चांगलं काम करुन मराठी लोकांचं मन जिंकलं त्यामुळे लोकांनी मागच्या वेळेसही मतं दिली, यावेळेसही दिली. मराठी माणूसही आमच्या बरोबर आहे आणि गैर मराठीही आमच्या बरोबर आहे. जोपर्यंत आम्ही चांगलं काम करत राहू तोपर्यंत सगळे आम्हाला मतदान करतील.” मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी News 18 लोकमतला एक मुलाखत दिली. त्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी हे भाष्य केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

२०१७ मध्ये नक्कीच आमचा महापौर बसला असता-फडणवीस

२०१७ मध्ये भाजपाचा महापौर मुंबईत बसू शकत होता, तो निर्णय का घेतला नाही यावरही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “१०० टक्के आम्हाला तेव्हा संधी होती. आम्ही सगळी जुळवाजुळवही केली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे यांनी आमच्याशी बोलणी केली होती. आमच्यासाठी हा भावनिक विषय आहे असं सांगितलं. त्यानंतर आम्ही हे सोडून दिलं. त्यांना सांगितलं की महापौरपदच नाही सगळी पदं तुम्ही घ्या. तुम्ही महापालिका चालवा आम्ही प्रहरीचं काम करु. पण २०१७ मध्ये सगळी जुळवाजुळव झाली होती, आमचा महापौर बसला असता. ती संधी सोडून दिली वगैरे जर तर ला काही अर्थ नसतो राजकारणात. आता आमचा महापौर होईल ना मुंबईत. यावेळी महायुतीचा महापौर असेल” असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.