मुंबई : सांताक्रुझ – चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्पातील वाकोला नाला – पानबाई शाळा उन्नत रस्त्यासह धारावी – वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या लोकार्पणाची प्रतीक्षा अखेर संपली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवार, १४ ऑगस्ट रोजी उन्नत रस्ता आणि उड्डाणपुलाचे लोकार्पण होणार आहे. पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यास वाकोला येथील वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. तर अमर महल जंक्शन – पश्चिम द्रुतगती महामार्ग दरम्यान केवळ ३० ते ३५ मिनिटांत सुसाट, सिग्नलमुक्त प्रवास करता येणार आहे. दुसरीकडे कलानगर उड्डाणपुल सुरू झाल्यास बीकेसीतील वाहतूक कोंडी कमी होईल.
पश्चिम आणि पूर्व उपनगरांना जोडून प्रवास अतिजलद करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सांताक्रुझ-चेंबूर जोडरस्ता प्रकल्प बांधला. पुढे या रस्त्यावरुन बीकेसी आणि वाकोल्याला अतिजलद जाता यावे यासाठी एमएमआरडीएने सांताक्रुझ – चेंबर जोडरस्ता प्रकल्पाचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कपाडिया नगर – वाकोला, पश्चिम द्रुतगती महामार्गदरम्यान ३.०६ किमी लांबीचा उन्नत मार्ग बांधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. त्यातील कपाडिया नगर – वाकोला नाला उन्नत रस्ता पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल झाला. मात्र वाकोला नाला – पानबाई शाळा अशा १.०२ किमीच्या उन्नत रस्त्याचे काम सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हे काम पूर्ण झाले.
काम पूर्ण झाले तरी हा उन्नत रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जात नव्हता. त्यामुळे प्रवासी – वाहनचालकांमध्ये नाराजी होती. स्थानिक आमदार वरुण सरदेसाई, आदित्य ठाकरे यांनीही हा उन्नत रस्ता खुला करण्याची मागणी केली होती. पण मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने या प्रकल्पाचे लोकार्पण रखडल्याचे सांगितले जात होते. आता मात्र या उन्नत रस्त्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा संपल्याची माहिती एमएमआरडीएतील सूत्रांनी दिली.
उन्नत रस्त्याचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गुरुवारी दुपारी २ वाजता होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. हा उन्नत रस्ता खुला झाल्यास वाहनचालक-प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. वाकोल्यातील, पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होईल. अमर महल जंक्शन – पश्चिम द्रुतगती महामार्ग प्रवास सुसाट होणार आहे.
पानबाई शाळा – वाकोला नाला उन्नत रस्त्यासह कलानगर जंक्शन उड्डाणपुलही गुरुवारी वाहतूक सेवेत दाखल होणार आहे. बीकेसीतील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी एमएमआरडीएने कलानगर जंक्शन येथे तीन उड्डाणपूल बांधण्याचा निर्णय घेतला होता. यापैकी एक धारावीकडून वांद्रे-वरळी सागरी सेतूकडे जाणाऱ्या उड्डाणपुलाचे काम शिल्लक होते. या उड्डाणपुलाचेही काम पूर्ण झाले होते. मात्र या उड्डाणपुलाच्या लोकार्पणासाठीही मुख्यमंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने लोकार्पणाची प्रतीक्षा होती. ती आता संपली आहे. गुरुवारी हा उड्डाणपूल वाहतूक सेवेत दाखल झाल्यास बीकेसी आणि कलानगर जंक्शन येथील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होणार आहे.