दादर येथील इंदूमिल परिसरात उभारण्यात येत असलेले भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक नियोजित वेळेत व अत्यंत दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी सर्व यंत्रणा काम करत आहेत. या शासनाच्या माध्यमातून वेळोवेळी आवश्यक निधी देखील उपलब्ध करून देण्यात असून, मार्च २०२४ पर्यंत या स्मारकाचे काम पूर्ण करणे अपेक्षित असल्याचे मत सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केले. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील इंदू मिल परिसरातील स्मारकाच्या सद्यस्थितीबद्दल आयोजित बैठकीत मुंडे बोलत होते.

यावेळी शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ.विश्वजीत कदम, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही.आर.श्रीनीवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ.प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यासह इतर अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.

मुंडे यांनी स्मारक उभारणीसाठी प्रगती तक्ता तयार करून दर पंधरा दिवसांनी या कामाच्या प्रगतीचा अहवाल घेण्यात येईल, असे स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिकृती धोरण निश्चितीसंदर्भातील सर्व कार्यवाही पार पाडण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पाठपुरावा करावा. हे काम मार्च २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचा निर्धार यावेळी बैठकीत करण्यात आला. स्मारक उभारणीचे काम जरी एमएमआरडीएकडे असले तरी राज्यशासनाने इंदूमिल स्मारक उभारणीच्या सनियंत्रणाची जबाबदारी सामाजिक न्याय विभागाकडे दिलेली आहे. त्यामुळे प्रत्येक आर्थिक वर्षात या कामासाठी लागणारा निधी विहित वेळेत उपलब्ध करून देणे तसेच वेळोवेळी कामकाजाच्या प्रगतीचा अहवाल तपासणे हे काम सातत्याने सुरू आहे. या स्मारकासाठी लागणारा निधी तात्काळ एमएमआरडीएला वितरण करण्याचे निर्देशही मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी दिले.

यावेळी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे महानगर आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवासन यांनी या परिसरात करण्यात येणा-या कामांची माहिती सादरीकरण तसेच प्रत्यक्ष भेट देवून माहिती सांगितली. प्रवेशव्दार, स्मारक इमारत, व्याख्यान वर्ग, ग्रंथालय, प्रेक्षागृह, बेसमेंट वाहनतळ याबद्दल सविस्तर माहिती दिली. एमएमआरडीए हे सर्व काम गतीने करत असून उर्वरीत काम गतीने करणार असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली.

मुंडे यांच्यासह शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, सामाजिक न्याय राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदत, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे महानगर आयुक्त एस.व्ही. आर. श्रीनिवासन, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, प्रसिध्द वास्तुविशारद शशी प्रभू, सहसचिव दिनेश डिंगळे यांनी इंदूमिल येथील स्मारक उभारणीच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करत सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली तसेच चालू कामाचा समग्र आढावा घेत संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या.

मंत्रिमंडळाने धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली स्मारकाचे सनियंत्रण व जलदगतीने काम पूर्ण करणे यासाठी एक उपसमिती नेमली असून, या उपसमितीमध्ये धनंजय मुंडे यांच्यासह नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचा समावेश आहे. या स्मारकाचे काम जलदगतीने पूर्ण व्हावे यासाठी दर पंधरा दिवसांनी या कामाचा आढावा घेणार असल्याचेही मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितले.