तुरुंगातून सुटकेसाठी आवश्यक असलेल्या जामिनाची रक्कम उभारणीकरिता विदेशातील मालमत्ता विक्रीला प्राधान्य देणाऱ्या सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी भारतातील मालमत्तांची मात्र अल्पावधीतच यशस्वी विक्री केली आहे. मुंबईतील काही विकासक तसेच गुजरातमधील हिरे व्यापाऱ्यांनी सहाराची मालमत्ता खरेदी केली असून यामार्फत सुमारे १,००० कोटी रुपयांचे व्यवहार झाले असल्याचे समजते.
मालमत्ता विक्रीसाठी सहाराश्रींना अधिक वेळ हवा
मालमत्ता विक्रीच्या वाटाघाटींसाठी सहाराप्रमुखांना १५ दिवसांची मुदतवाढ
गेल्या पाच महिन्यांपासून तिहार तुरुंगात असलेल्या रॉय यांनी १० हजार कोटी रुपयांच्या जामीन रकमेसाठी अमेरिका आणि लंडनमधील तीन हॉटेलच्या विक्रीसाठी प्रयत्न चालविला आहे. या मालमत्ता खरेदीसाठी प्रसिद्ध भारतीय उद्योजक सायरस पूनावाला तसेच आखातातील ब्रुनेईचे सुलतान, सौदी अरेबियाचे राजे यांनी बोली प्रक्रियेद्वारे उत्सुकता दाखविली आहे. मात्र, अद्याप त्याबाबतचे व्यवहार सुरूही झाले नाहीत. याउलट सहारा यांच्या भारतातील मालमत्ता विक्रीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे. मुंबईतील बांधकाम विकासक तसेच गुजरातमधील हिरे व्यापाऱ्यांनी गेल्या काही दिवसांत अनेक मालमत्ता खरेदीचे व्यवहार पूर्ण केले आहेत. कोणतेही निवासी अथवा वाणिज्यिक बांधकाम नसलेल्या या केवळ जागा विक्रीच्या माध्यमातून सहाराने १,००० कोटी रुपये जमविल्याचे कळते. गेल्या काही दिवसांत झालेल्या या व्यवहाराला सहारा समूहाने दुजोरा दिला असला तरी आर्थिक व्यवहारांचा आकडा मात्र समूहाच्या प्रवक्त्याने उलगडलेला नाही. मुंबई, पुणे, सुरत आदी ठिकाणच्या मालमत्ताही लवकरच विकून मोठी रक्कम उभी करेल, एवढीच माहिती समूहाने दिली. भारतातील या मालमत्ता विक्रीतून समूहाला रॉय यांच्या जामिनापैकी किमान निम्मीच रक्कम, ५००० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे.
मालमत्ता खरेदीदार
*वसईतील २६५ एकर जमीन: अतुल प्रोजेक्टस्
*अहमदाबादमधील १०४ एकर जमीन : सफल ग्रुप
*भावनगरमधील १०० एकर जमीन : सुरतचे उद्योजक राहुल राज
*जोधपूरची ९२ एकर जागा : मुंबईतील हिरे व्यापारी
संग्रहित लेख, दिनांक 16th Aug 2014 रोजी प्रकाशित
‘सहाराश्रीं’ना हिरे व्यापाऱ्यांचा ‘सहारा’!
तुरुंगातून सुटकेसाठी आवश्यक असलेल्या जामिनाची रक्कम उभारणीकरिता विदेशातील मालमत्ता विक्रीला प्राधान्य देणाऱ्या सहारा समूहाचे अध्यक्ष सुब्रतो रॉय यांनी भारतातील मालमत्तांची मात्र अल्पावधीतच यशस्वी विक्री केली आहे.
First published on: 16-08-2014 at 12:46 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diamond merchants come forward to help saharasri subrata roy