मुंबई महापालिका आणि शिवसेनेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या सागरी मार्गाला विरोध करणाऱ्यांचे पारडे जड झाले आहे. पालिकेकडे सादर झालेल्या सुमारे ४८३ सूचना आणि हरकतींमध्ये २६६ जणांनी विरोध नोंदविला आहे. तर काही कोळीबांधवांनी पत्राद्वारे प्रकल्पाला विरोध दर्शविला आहे. मात्र २१७ जणांनी या प्रकल्पाला पसंती दर्शवत काही सूचना केल्या आहेत.

नरिमन पॉइंट ते मालाड दरम्यान ३६ कि.मी. लांबीचा सागरी मार्ग पालिकेतर्फे उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाबाबत पालिकेने अलिकडेच सूचना आणि हरकती मागविल्या होत्या. सुमारे ४८३ जणांनी पालिककेड आपल्या सूचना आणि हरकती सादर केल्या. त्यापैकी २६६ जणांनी या प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. त्यात सामाजिक संस्था, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ, प्रकल्पाच्या वाटेतील स्थानिक रहिवाशी आदींचा समावेश आहे. या प्रकल्पाला कोळी बांधवांकडूनही प्रचंड विरोध केला जाता आहे. सूचना आणि हरकती सादर करण्याबरोबरच २९६ कोळी बांधवांनी पोस्ट कार्ड पाठवून निषेध नोंदविला आहे. तसेच नाना-नानी पार्कमध्ये झालेल्या स्वाक्षरी मोहिमेत ९५० जणांनी स्वाक्षरी करीत या प्रकल्पास विरोध दर्शविला आहे. मात्र पालिकेकडे सादर झालेल्या एका निवेदनावर तब्बल १,४२४ जणांनी स्वाक्षरी करीत सागरी मार्ग उभारण्याच्या पारडय़ात मत टाकले आहे. पालिकेकडे ई-मेलद्वारे ४०६ जणांनी सूचना आणि हरकती सादर केल्या. त्यामध्ये १९५ जणांनी सागरी मार्गाला अनुकूलता दर्शविली, तर २११ जणांनी विरोध नोंदविला आहे.