मुंबई : मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातर्फे यंदाचा ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ अष्टविनायक नाट्यनिर्मिती संस्थेचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव यांना जाहीर झाला आहे. रंगभूमीवर महत्त्वाचे आणि वेगळ्या प्रकारचे काम करणाऱ्या व्यक्तींच्या योगदानावर प्रकाशझोत टाकण्याच्या उद्देशाने दरवर्षी मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या कलामंडळ शाखेतर्फे नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान केला जातो.

यंदा हा पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवार, १ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.०० वाजता दादर (पूर्व) येथील मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयातील शारदा मंगल सभागृहात होणार आहे. प्रसिद्ध साहित्यिका आणि संस्थेच्या वार्षिकोत्सवाच्या अध्यक्षा मोनिका गजेंद्रगडकर यांच्या हस्ते दिलीप जाधव यांना ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रंगभूमी हीच कर्मभूमी मानत ज्येष्ठ नाट्यनिर्माते दिलीप जाधव रंगभूमीची सेवा करीत आहेत. नाट्यक्षेत्रातील त्यांच्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. याप्रसंगी साहित्य व नाट्यक्षेत्रातील दिग्गजांसह ग्रंथालयकर्मींनाही पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. प्रसिद्ध साहित्यिका मोनिका गजेंद्रगडकर प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असून ‘समाजमाध्यमांवरील लेखन आणि लेखक’ या विषयावर अध्यक्षीय भाषण करणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गेल्या ५३ वर्षांपासून रंगभूमीची अविरत सेवा करीत आहे. अनेक नाटकांना महाराष्ट्र शासन, झी गौरव, आर्यन सन्मान असे अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या केशवराव दाते पुरस्काराचेही (नटवर्य मामा पेंडसे पुरस्कृत) विशेष महत्त्व आहे. माझ्यासाठी हा अत्यंत आनंददायी क्षण आहे. गेल्या ५३ वर्षांत मला ज्यांच्याकडून या रंगभूमीबद्दल थोडे शिकता आले, अशा नाट्य निर्मिती संस्था, लेखक, निर्माते, दिग्दर्शक, कलावंत, तंत्रज्ञ, पडद्यामागील मंडळी, असंख्य मित्र व मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, त्यांची निवड समिती या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आजवरच्या माझ्या कामाची दखल घेत हा महत्त्वाचा पुरस्कार दिल्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. यापुढेही माझ्याकडून रंगभूमीची सेवा अविरत होत राहील हेच वचन देऊ शकतो’ , अशी कुतज्ञ भावना दिलीप जाधव यांनी व्यक्त केली.