मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या बदल्या आणि फेरबदल्यांमुळे महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांच्यावर टीका झाल्यानंतर आता प्रशासनाने मौन सोडले आहे. प्रशासनातील वरिष्ठ पातळीवर होत असलेले फेरबदल हे पूर्णपणे प्रशासकीय स्वरुपाचे आहेत. त्यामध्ये कोणताही राजकीय हस्तक्षेप अथवा दबाव नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा >>>मुंबई : म्हाडा भरती परीक्षा निकाल जाहीर

गेल्या दोन महिन्यांपासून मुंबई महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या होत आहेत. मात्र अल्पावधीतच काही अधिकाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचे प्रकारही वाढले आहेत. यामध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याचा आक्षेप माध्यमाद्वारे करण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाने आपली भूमिका मांडली आहे.

हेही वाचा >>>“खोक्यांचा विषय हा ‘मातोश्री’ला…”; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर

विविध विभाग आणि खाती यांच्या जबाबदारीचे खांदेपालट करताना संपूर्णतः प्रशासकीय बाबी लक्षात घेऊन निर्णय घेण्यात येत आहेत. भारतीय प्रशासकीय सेवेतील अजित कुंभार यांच्याकडे दक्षता खात्याच्या सह आयुक्तपदाचा पूर्णवेळ, तर शिक्षण खात्याचे अतिरिक्त कारभार होता. या दोन्ही अत्यंत महत्त्वाच्या व व्यापक कामकाज असलेल्या खात्यांची जबाबदारी पाहता कामकाजाचा ताण कमी करण्यासाठी कुंभार यांना शिक्षण खाते पूर्णवेळ सोपवण्यात आले होते. तर उबाळे यांच्याकडे दक्षता खाते देण्यात आले. मात्र अभियांत्रिकी खात्यांशी संबंधित संवर्गाने प्रशासनाकडे निवेदन केले की, दक्षता खात्याचे बहुतांशी कामकाज हे अभियांत्रिकी संवर्गाशी संबंधित आहे. अभियांत्रिकी कामांची आणि मनुष्यबळाची प्रशासकीय निकड लक्षात घेता दक्षता खात्याची धुरा शक्यतो भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांकडे सोपवली जाते. जेणेकरून महानगरपालिकेसह विविध प्राधिकरणांशी आणि शासनाशी समन्वय साधण्यास मदत होते. हे निवेदन लक्षात घेऊन भारतीय प्रशासकीय सेवेतील अजित कुंभार यांच्याकडेच दक्षता खाते पूर्ण वेळ स्वरूपात सोपवून उबाळे यांना शिक्षण खात्याची पूर्ण वेळ जबाबदारी देण्यात आली आहे, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.