मुंबई महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी काँग्रेस पक्षात विविध पातळ्यांवर चर्चा सुरू असल्याचे काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सांगितले. आम्ही केवळ मुंबईच्या भल्यासाठी हे सर्व करत असल्याचेही नितेश राणे यांनी स्पष्ट केले. मात्र, दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरूदास कामत यांनी शिवसेनेसोबत युती करण्याबद्दल तीव्र आक्षेप घेतला आहे. कामत यांच्याकडून यासंदर्भातील एक परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिकेत शिवसेनेला पाठिंबा देण्याची चर्चा करण्याला किंवा अप्रत्यक्षपणे पाठिंबा देण्याला माझा तीव्र आक्षेप आहे. आपण आत्तापर्यंत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांच्या फूट पाडण्याच्या धोरणाविरुद्ध लढा दिला आहे. त्यामुळे आपण त्यांच्याशी युती केल्यास जनता आपल्याला कदापि माफ करणार नाही. त्यांच्या समस्या त्यांनीच सोडवाव्यात. मी याबाबतचे माझे मत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना कळवले आहे, असे कामत यांनी या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे आता काँग्रेस पक्ष नेमका काय निर्णय घेणार याची उत्सुकता अनेकांना लागली आहे. मात्र, एकुणच परिस्थितीवर नजर टाकल्यास शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून काँग्रेसमध्ये वेगवेगळे मतप्रवाह असल्याचे दिसते. विशेषकरून नारायण राणे आणि संजय निरूपम हे माजी शिवसैनिक शिवसेनेला पाठिंबा देण्याच्याबाबतीत सकारात्मक असल्याचे दिसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना काँग्रेस राज्य सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा आरोप केला आहे. राज्यातील भाजप सरकार पडावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.काँग्रेसच्या या ‘खेळी’वरून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्यातील भाजप सरकार पडावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले. मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नाही. शिवसेना क्रमांक एकचा पक्ष ठरला असून त्यापाठोपाठ भाजपच्या जागा निवडून आल्या आहेत. निकालानंतर भाजप आणि शिवसेनेकडूनही सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू आहेत. तर शिवसेनेने कुणासोबत सत्तेत बसायचे यासाठीचे पर्याय राखून ठेवले आहेत. मुंबईच्या महापौरपदासाठी काँग्रेसचा पाठिंबा मिळावा, अशी शिवसेनेची इच्छा असल्याचे सूत्रांकडून समजते. तर काँग्रेसने पाठिंबा दिल्यास त्यांना उपमहापौरपद दिले जाऊ शकते, अशी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. तसेच शिवसेना देवेंद्र फडणवीस सरकारशी ‘नाते’ तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेचे नवीन समीकरण तयार करू शकतात, अशा चर्चांनाही ऊत आला आहे. त्यात मुंबईत सत्तास्थापनेसाठी पाठिंबा देण्याबाबत काँग्रेसच्या नेत्यांकडून जाहीरपणे वक्तव्ये केली जात आहेत. त्यामुळे भाजपने संताप व्यक्त केला असून, काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट काँग्रेसवर ‘राग’ व्यक्त केला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Discussions to extend support to shivsena within congres party says rane gurudas kamat
First published on: 25-02-2017 at 15:49 IST