मुंबई : मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने शिवसेना (एकनाथ शिंदे) मंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मंगळवारी मंत्रिमंडळ बैठकीत तीव्र नाराजी व्यक्त केली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेही या वेळी उपस्थित होते. याखेरीज नाशिक तसेच रायगडच्या पालकमंत्रीपदाचा वाद मिटलेला नाही. याबाबतच्या वार्षिक योजना मंजुरीच्या बैठकांना शिंदे गटाचे मंत्री गैरहजर राहिले.

मंत्रिमंडळाचे नियोजित मुद्द्यांचे कामकाज आटोपल्यावर अधिकारी बैठकीतून बाहेर पडल्यावर हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. भरत गोगावले यांचा मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर त्यांनी एसटीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त पदाचा कार्यभार परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे न देता अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी यांच्याकडे सोपविण्याचे आदेश सरनाईक यांना अंधारात ठेवून काढण्यात आले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यापुढे अनेक विषय न ठेवता परस्पर त्यास मंजुऱ्या देण्यात येत आहेत. सामंत यांनी यासंदर्भात उद्योग खात्याचे प्रधान सचिव आणि एमआयडीसीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रही पाठविले असून सर्व महत्त्वाचे विषय मंजुरीसाठी आपल्यापुढे ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासंदर्भातही मुख्यमंत्र्यांपुढे मंगळवारी मुद्दा उपस्थित करण्यात आला. प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून मंत्र्यांच्या अधिकारांवर गदा येत असल्याने नाराजी व चिंता व्यक्त करण्यात आली.

पालकमंत्रीपदाच्या वादाचा बैठकांना फटका?

रायगड जिल्ह्याची वार्षिक योजना मंजूर करण्यासाठी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आयोजित केलेल्या बैठकीला रोजगार हमीमंत्री भरत गोगावले हे अनुपस्थित असल्याने बैठक लांबणीवर टाकावी लागली. रायगड जिल्ह्यात राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे आणि शिवसेनेचे भरत गोगावले असे दोन मंत्री आहेत. आदिती तटकरे बैठकीला उपस्थित होत्या. तर भरत गोगावले यांनी रायगडवरील किल्ले धारातीर्थ मोहिमेच्या सांगता कार्यक्रमामुळे उपस्थित राहू शकलो नाही असे सांगितले. आमच्यात धुसफुस वगैरे काही नाही, असा खुलासा अजित पवार यांनी बैठकीनंतर केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दादा भुसेही अनुपस्थित

रायगडाबरोबरच नाशिकच्या पालकमंत्रीपदाला स्थगिती देण्यात आली आहे. नाशिक जिल्हा वार्षिक योजनेला मंजुरी देण्याच्या बैठकीस शिवसेनेचे दादा भुसे उपस्थित नव्हते. रायगड आणि नाशिक या दोन्ही जिल्ह्यांतील शिवसेनेचे मंत्री अजित पवारांकडील बैठकीला उपस्थित नव्हते.