scorecardresearch

‘ऑस्कर’वरून राजकीय वाद ; पेंग्विनच्या इंग्रजी नावाला भाजपचा आक्षेप; महापौरांचे तिखट प्रत्युत्तर

राणीच्या बागेत जन्माला आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाचे ऑस्कर असे नामकरण करण्यात आले.

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (राणीची बाग) पेंग्विनच्या पिल्लाच्या नावावरून शिवसेना आणि भाजपमध्ये नवा वाद रंगू लागला आहे. मराठी पाटय़ांचा आग्रह धरत असताना पेंग्विनचे नाव मात्र इंग्रजी का, असा सवाल भाजपने केला तर, भविष्यात प्राण्यांची ‘चंपा’, ‘चिवा’ अशी नावे ठेवू, असे प्रत्युत्तर देत महापौरांनी या वादाला आणखी फोडणी दिली.

 राणीच्या बागेत जन्माला आलेल्या हम्बोल्ट पेंग्विनच्या पिल्लाचे ऑस्कर असे नामकरण करण्यात आले. महापौरांच्या उपस्थितीत नामकरणाचा सोहळा पार पडला. भाजपने यात शिवसेनेवर टीका करण्याची संधी शोधली. ‘दुकानांवरील पाटय़ांपुरताच मराठीचा आग्रह धरला जातो, मात्र युवराजांच्या पेंग्विनचे नाव मात्र इंग्रजीत ठेवण्यात आले आहे,’ अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली. 

ही टीका जिव्हारी लागल्याने महापौरांनीही त्याला तसेच प्रत्युत्तर दिले. ‘ भाजपने केवळ विरोधासाठी विरोध करणे आणि पातळी सोडून टीका करणे सोडावे. राणीच्या बागेत जन्माला येणाऱ्या हत्तीच्या पिल्लाचे नाव चंपा, तर माकडाच्या पिल्लाचे नाव चिवा ठेवू या,’ असा टोला किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. ऑस्कर पुरस्कार चालतो, मग ऑस्कर नाव का नाही, असा सवालही त्यांनी केला.

 विदेशातील दुर्मीळ प्राणी राणीच्या बागेत आणण्यात येत असून त्याच्या निविदेमध्ये १०६ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत भाजपने निविदा प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी केली आहे. भाजपने पूर्ण अभ्यास करावा आणि मग घोटाळा झाल्याचे सिद्ध करावे, असा टोलाही महापौरांनी पत्रकारांशी बोलताना लगावला.

दुर्मीळ प्राणी आणण्याच्या प्रक्रियेत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप

मुंबई : राणीच्या बागेत दुर्मीळ प्राणी विदेशातून आणण्याच्या निविदेत ‘ पेंग्विन ’ टोळीकडून १०६ कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत ही निविदा प्रक्रिया त्वरित थांबवावी, अशी मागणी भाजपचे प्रदेश कोषाध्यक्ष आमदार मिहीर कोटेचा, मुंबई महापालिकेतील भाजप पक्षनेते विनोद मिश्रा, नगरसेविका राजश्री शिरवाडकर यांनी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषदेत केली आहे. 

राणीच्या बागेत ब्लॅक जॅग्वार, चित्ता, पांढरा सिंह, चिंपांझी यासारखे प्राणी आणण्यासाठी मुंबई महापालिकेने निविदा मागविल्या आहेत. या निविदेत गैरप्रकार होत असून निविदा रकमेपेक्षा अधिक रकमेच्या निविदा भरल्या जातील, असे पत्र महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना २० ऑक्टोबर रोजी पाठविले होते, असे भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. प्रत्यक्ष निविदा उघडल्यानंतर ही भीती खरी ठरल्याचे सांगत १८८ कोटी रुपयांच्या बोलीसाठी २९४ कोटींच्या निविदा सादर केल्या गेल्या आहेत, असे कोटेचा  यांनी सांगितले. या संदर्भात भाजपने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dispute between shiv sena and bjp over the name of penguin puppy zws

ताज्या बातम्या