लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक  विस्कळीत
मुंबई : राज्यातील अनेक भागांत बुधवार रात्रीपासून पडलेल्या मुसळधार पावसाने मेल-एक्स्प्रेस प्रवाशांची मोठी कोंडी केली. पावसाचा फटका कर्जत ते लोणावळा आणि कसारा ते इगतपुरी घाट क्षेत्राला बसला. तब्बल २१ ठिकाणी दरड कोसळण्यासह विविध घटनांमुळे या मार्गावरील मेल-एक्स्प्रेसचे वेळापत्रक गुरुवारी कोलमडले. अशीच कोंडी कोकण रेल्वे मार्गावरही झाली असून चिपळूण ते कामथेदरम्यान पूरस्थिती निर्माण झाल्याने कोकण रेल्वे सेवा विस्कळीत झाली. मुंबईच्या दिशेने येणाऱ्या व मुंबईतून राज्यात व त्याबाहेर जाणाऱ्या अनेक गाड्या अडकल्या. काही गाड्या रद्द करण्यात आल्या, तर १००हून अधिक गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम झाला. घाट क्षेत्रातील मार्ग सुरळीत करण्याचा प्रयत्न रेल्वेकडून सुरू होता. रेल्वेचे कोट्यवधीचे नुकसान झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

कोकण रेल्वेला फटका

वासिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने चिपळूण व कामथेदरम्यान असलेले रेल्वे रूळ पाण्याखाली गेले. त्यामुळे कोकण रेल्वेही ठप्प झाली. अनेक गाड्या विविध स्थानकांत थांबवून ठेवण्यात आल्या.

रखडपट्टी…  मुंबईतून रात्री प्रवासाला निघालेले प्रवासी हे कसारा, बदलापूर, कर्जतपर्यंतच प्रवास करू शकले. तब्बल बारा तासांपेक्षा अधिक वेळ या पट्ट्यातच ट्रेन अकडल्याने पुढे प्रवास करणार कसा, असा प्रश्न प्रवाशांना पडला. गाडी रद्द झाल्याची माहिती आयत्या वेळी मिळाल्याने कुटुंब व सामानासह स्थानकात आलेल्या अनेक प्रवाशांना माघारी फिरावे लागले. त्यामुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाली.

गाड्यांचे मार्ग बदलले…

कोंडी टाळण्यासाठी व पुढील प्रवास होण्यासाठी मुंबईतून बनारस, अमृतसर, गोरखपूर, पाटलीपुत्र, पुरी या उत्तर भारतात जाणाऱ्या काही गाड्या ठाणे, वसई रोड, नंदुरबार, जळगाव मार्गे वळवण्यात आल्या. उत्तर भारतातूनही मुंबईच्या दिशेने येणाऱ्या काही गाड्या याच मार्गाने हळूहळू येत होत्या. पर्यायी मार्गाने यावे लागत असल्याने प्रवाशांचा प्रवास बराच लांबला. गोंदिया, नागपूर, सिकंदराबाद, अमरावती येथून ‘सीएसएमटी’कडे येणाऱ्या गाड्या मनमाड, भुसावळपर्यंतच चालवून पुन्हा त्या अमरावती, नागपूरसाठी रवाना करण्यात आल्या. त्यामुळे मुंबईत येण्यासाठी निघालेले अनेक प्रवासीमधील स्थानकांवर अडकले. दादर, सीएसएमटी येथून अमरावती, साईनगर शिर्डीसाठी सुटलेल्या गाड्याही फक्त कल्याणपर्यंतच चालवल्या.

 

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Disruption of long distance train schedules of railway passengers akp
First published on: 23-07-2021 at 01:41 IST