मुंबई : राज्य सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर हा जन्मदिवस ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती या कालावधीत आयोजित केलेल्या राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा उपक्रमात राज्याच्या सामाजिक न्याय विभागाने आघाडी घेतली आहे. या कालावधीत सहा हजारांहून अधिक कार्यक्रमांचे आयोजन करून सुमारे तीन लाख नागरिकांना विविध योजनांचे लाभ देण्यात आले असून, त्यात ३४ हजार विद्यार्थ्यांना जातवैधता व  जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. मंत्रालयात मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांच्या हस्ते सामाजिक न्याय विभागाच्या सेवा पंधरवडा उपक्रमांच्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या वेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अप्पर मुख्य सचिव मनोज सौनिक, प्रधान सचिव (वित्त व सुधारणा) राजगोपाल देवरा, वैद्यकीय शिक्षण विभागाच्या सचिव अश्विनी जोशी, सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, समाजकल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे, अवर सचिव अनिल अहिरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा कर्तव्यपथ’ या उपक्रमांतर्गत राज्यात सामाजिक न्याय विभागाच्या वतीने सहा हजारांहून अधिक विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्या माध्यमातून पाच लाखांहून अधिक नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला, तर त्यातील तीन लाख नागरिकांना विविध योजनांचा लाभ देण्यात आला.

सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत राज्यात ५१९ ठिकाणी आयोजित जातवैधता प्रमाणपत्र जनजागृती शिबिरात १६०० महाविद्यालयांतील ७९ हजार पालक व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. त्यात १७ हजार २८२ विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्रे व १७ हजार विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तृतीयपंथी व्यक्तींना ओळखपत्रे देण्यासाठी ४५ ठिकाणी शिबिरे आयोजित करण्यात आली. त्यात ४६४ लाभार्थ्यांना प्रमाणपत्रे व ओळखपत्रे देण्यात आली.

स्टँडअप योजनेतील २१ नवउद्योजकांचे प्रस्ताव या कालावधीत विभागाकडे प्राप्त झाले. अनुसूचित जातीच्या २६५ वस्त्यांमध्ये जाऊन आदर्श वस्त्या निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती या वेळी देण्यात आली. सेवा पंधरवडा उपक्रमांतर्गत समाजकल्याण विभागाने राज्यात राबविलेले विविध उपक्रम यशस्वी ठरले आहेत, त्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत, त्यामुळे राज्यात समाजकल्याण विभागाची कामगिरी लक्षणीय ठरली आहे व जनतेलाही त्याचा मोठय़ा प्रमाणावर लाभ झाला आहे, असे डॉ. प्रशांत नारनवरे यांनी सांगितले. 

ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबिरे

 ज्येष्ठ नागरिकांसाठी ३११ ठिकाणी आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन केले होते. त्यात १९ हजार ६८१ नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी राज्यात ३१४ शिबिरे आयोजित केली होती, त्यातून ९१ हजार ८२४ जणांना वैश्विक ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच राज्यातील १६ हजार ८४८ ऊसतोड कामगारांना ओळखपत्रे देण्यात आली. शासकीय वसतिगृहे व निवासी शाळा या ठिकाणी १७०७ विविध कार्यक्रमांचे व स्पर्धाचे आयोजन करण्यात आले. त्यात ८४ हजार ८० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या उपक्रमाच्या कालावधीत विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी ३८५ वसतिगृहांमध्ये जाऊन ३१ हजार ४१० विद्यार्थ्यांशी संवाद साधला. जिल्हा समाजकल्याण अधिकारी यांच्या माध्यमातून विशेष मोहिमेंतर्गत १ लाख ७३  हजार ६५४ विद्यार्थ्यांचे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती अर्ज भरून घेण्यात आले.