मुंबई : राज्यातील जिल्ह्यांच्या प्रगतीच्या पाऊलखुणांचा मागोवा घेण्यासाठी ‘लोकसत्ता’तर्फे हाती घेण्यात आलेल्या ‘जिल्हा निर्देशांक’ उपक्रमाची सांगता शुक्रवार, ३ मार्चला मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार आहे. यानिमित्ताने विख्यात सांख्यिक आणि गणिती, केंद्रीय सांख्यिकी आयोगाचे प्रमुख राजीव करंदीकर यांचे ‘विकासासाठी विदा महती’ या विषयावर व्याख्यान होईल. ‘सारस्वत बँक’ पुरस्कृत या उपक्रमात पुणेस्थित ‘गोखले अर्थशास्त्र’ संस्थेने यातील सांख्यिकी विश्लेषणाची जबाबदारी पार पाडली.
एका बाजूला टोकाची गरिबी आणि दुसरीकडे अमर्याद साधनसंपत्तीची उपलब्धता अशा असमानतेत राज्यातील जिल्हे विभागले गेले आहेत. त्यामुळे त्या सर्वाना एकाच मापात मोजणे अशक्य आणि अन्यायकारकही होते. त्यामुळे शेवटच्या ‘मानव्य विकास निर्देशांका’नुसार राज्यातील जिल्ह्यांची चार गटांत वर्गवारी करण्यात आली. त्यानंतर त्या-त्या गटातील जिल्ह्यांचे तौलनिक विश्लेषण करून प्रत्येक गटातील दोन असे एकूण आठ जिल्हे चांगल्या कामगिरीसाठी निवडले गेले. तसेच प्रगतीच्या फारशा सोयी-सुविधा नसतानाही, तळाला असूनही विविध परिमाणांत लक्षवेधी कामगिरी करणारा एक जिल्हा परीक्षकांनी निवडला. अशा एकूण नऊ जिल्हाप्रमुखांचा यावेळी फडणवीस यांच्या हस्ते गौरव केला जाईल. गोखले अर्थशास्त्र संस्थेचे कुलगुरू, विख्यात अर्थभाष्यकार अजित रानडे, मँकेंझी या बहुराष्ट्रीय सल्लागार कंपनीचे मुंबईतील ज्येष्ठाधिकारी शिरीष संख्ये, स्वत: अर्थ अभ्यासक असलेले राज्याचे माजी मुख्य सचिव सीताराम कुंटे आणि ‘अर्थ ग्लोबल’ या वित्त-सल्ला कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, माजी संपादक डॉ. निरंजन राजाध्यक्ष या तज्ज्ञांनी या उपक्रमात मार्गदर्शक-परीक्षकाची भूमिका पार पाडली. सुमारे आठ महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर सिध्द झालेला हा निर्देशांक येत्या शुक्रवारी मुंबईत एका विशेष समारंभात प्रसिद्ध केला जाईल.