दिवाळीच्या तयारीसाठी धारावीचा कुंभारवाडा सजला असून सध्या येथे मोठय़ा प्रमाणात आकर्षक पणत्यांची विक्री होत आहे. धारावीतील कुंभारवाडय़ात पणत्या तयार करण्याचा मोठा व्यवसाय आहे. परंपरेने आजही गुजरातमधील एक समाज या पणत्यांच्या व्यवसायात सक्रिय आहे. या परिसरात प्रामुख्याने मातीच्या साध्या पणत्या तयार केल्या जातात. तसेच, गुजरातमधून आलेल्या नक्षीदार आकाराच्या तयार पणत्यांना रंगरंगोटी करण्याचे काम येथे केले जाते. साध्या पणत्यांना दोन प्रकारचे रंग देण्यासाठी १०० नग पणत्यांमागे २० ते ३० रुपये दिले जातात. तर नक्षीदार पणत्यांना रंगरंगोटी करण्यासाठी प्रत्येकी ६ पणत्यांमागे ६ रुपये दिले जातात. सध्या कुंभारवाडय़ात स्पर्धा खूप वाढली आहे. त्यामुळे मिळेल त्या पैशांमध्ये काम करावे लागते, असे रेखा चौहान या महिलेने सांगितले.
आजही कुंभारवाडय़ात कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून पणत्या रंगवण्याचे काम करतात. या परिसरात प्रामुख्याने साध्या पणत्या तयार केल्या जातात. मुंबईतून व क्वचित प्रसंगी गुजरातहून लाल रंगाच्या मातीपासून या पणत्या तयार केल्या जातात. पूर्वीच्या काळी माती भिजविण्यासाठी घरातच खड्डा तयार केला जात होता. मात्र सध्याची पिढी या व्यवसायात इच्छुन नसल्याने घरातील खड्डा बूजवून घराबाहेर चौकोनी खड्डा तयार करण्यात आला आहे. येथे माती भिजवली जाते. ही माती पणत्या, माठ आदी वस्तू तयार करण्यासाठी वापरली जाते. मातीतील मोठे खडे, कचरा काढून टाकला जातो. कुंभारवाडय़ातील अधिकतर व्यवसाय हा घरातील एका खोलीत केला जातो. पणत्या तयार केल्यानंतर याला काही काळ उन्हात वाळवले जाते. पणत्या चांगल्या वाळल्यानंतर घरासमोर तयार केलेल्या भट्टीच्या वरच्या थरावर एका वेळेला हजारो पणत्या ठेवल्या जातात. या भट्टीच्या खाली कापूस व माती एकत्र करून पसरवले जाते आणि त्या भट्टीच्या वरच्या थरात पणत्या ठेवल्या जातात. भट्टीच्या खालच्या बाजूला कोपऱ्यांमधील छिद्रांमध्ये गरम माती घातली जाते. अशा प्रकारे पणत्या भाजण्याचे काम केले जाते.
या पणत्या गेरुच्या घट्ट रंगात भिजवून, सुकल्यानंतर विक्रीसाठी ठेवल्या जातात. कुंभारवाडय़ात या पणत्या अगदी स्वस्त दरात मिळतात. बाजारात ज्या पणत्या १० रुपयांना तीन किंवा ४ विकल्या जातात. त्या पणत्या कुंभारवाडय़ातून खरेदी केल्यास १०० रुपयांना ९० पणत्या सहज मिळतात. त्यामुळे मुंबई व आसपासच्या परिसरातील स्थानिक छोटे व्यापारी कुंभारवाडय़ातून मोठय़ा संख्येने पणत्यांची खरेदी करतात. गेली अनेक वर्षे मिनाक्षी कौसाकिया या कुंभारवाडय़ात पणत्यांची विक्री करीत आहेत. मात्र गेल्या काही दिवसात पूरेसा व्यवसाय होत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आबालवृद्ध दंग
दिवाळीमध्ये सर्वाधिक गजबज कुंभारवाडय़ात असते. तसे पाहता वर्षभर येथे मातीच्या वस्तू तयार केल्या जातात. मात्र दिवाळीच्या दिवसात कुंभारवाडय़ातील प्रत्येक घरात पणत्या तयार करण्याचे व रंग देण्याचे काम सुरू असते. अगदी आई-बाबांबरोबरच लहान मुलेही पणत्यांना रंग देण्यात दंगलेले असतात.
केवळ २० ते ३० रुपये
सध्या कुंभारवाडय़ात छोटय़ा, माठाच्या आकाराच्या, झाडाच्या पानासारख्या, दोन थरांच्या पणत्या बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत. बाहेरील बाजारांमध्ये या पणत्या ५० ते १०० रुपयांनी विकल्या जातात. मात्र कुंभारवाडय़ात या पणत्यांसाठी २० ते ३० रुपये आकारले जातात.