मुंबई- वडाळ्यात राहणारा ३२ वर्षीय डॉक्टर सेक्सटॉर्शनचा बळी ठरला आहे. इन्स्टाग्रामवर भेटलेल्या एका तरुणीने त्याच्याशी अश्लील संभाषण करून त्या आधारे त्याच्याकडून ९५ लाख रुपये उकळले आहेत. नंतर ही अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी या तरुणीने दिली होती.
तक्रारदार डॉक्टर अस्थिरोगतज्ज्ञ असून मुंबईच्या नामांकित रुग्णालयात काम करतो. फेब्रुवारी महिन्यात इन्स्टाग्रामवर त्याची ओळख सौम्या अवस्थी नावाच्या तरुणीशी झाली. तिने चंदिगढच्या ज्ञानसागर वैद्यकीय महाविद्यालय शिक्षण घेत असल्याचे सांगितले. मी मूळची दिल्लीची आहे. माझे आई वडील दिल्लीत राहतात. बालपणापासून एकटी असल्याचे सांगत डॉक्टरची सहानभूती मिळवली. गोड बोलून सौम्याने त्याला आपल्या मैत्रीच्या जाळ्यात ओढले.
अश्लील संभाषण करायला सुरवात
डॉक्टर जाळ्यात फसल्यावर सौम्याने डॉक्टरशी अश्लील संभाषण करण्यास सुरवात केली. तिच्या सौंदर्याच्या जाळ्यात अडकलेला डॉक्टरही तिच्याशी अश्लील संभाषण करू लागला. त्यानंतर सौम्याने डॉक्टरला आपले अश्लील छायाचित्र पाठवले आणि डॉक्टरला देखील त्याचे अश्लील छायाचित्रे आणि चित्रफिती पाठविण्यास भाग पाडले. मी लवकरच मुंबईला येईन असे प्रलोभन दाखवले. या काळात तिने डॉक्टरकडून अनेक महागड्या भेटवस्तू मागून घेतल्या होत्या.
मोबाईल हॅक, अडीच कोटींची खंडणीची थाप
२ मे रोजी सौम्याने डॉक्टरला मोठा धक्का दिला. माझा मोबाईल थायलंडच्या हॅकरने पेगासिस या सॉफ्टवेअरद्वार हॅक केला असून आपले अश्लील संभाषण (चॅट) आणि चित्रफिती (न्यूड व्हिडियो) त्याच्याकडे गेले आहेत. पुढील ६५ तासात जर अडीच कोटी रुपये (३.१० बिटकॉईन) नाही दिले तर हॅकर हे अश्लील छायाचित्र प्रसारित करेल असे सांगितले. त्याने सौम्याकडे हॅकरची माहिती मागितली. मात्र तिने दिली नाही. मी दागिने विकून, पैसे उसने घेऊन हॅकरला पैसे देण्याची जुळवाजुळव करत असल्याचे सौम्याने सांगितले.
डॉक्टरकडून उकळले ९५ लाख रुपये
या प्रकाराने डॉक्टर घाबरला होता. आता तो पुरता फसला हे लक्षात आल्यावर सौम्याने पुढचा डाव टाकला. तिने डॉक्टरला ब्लॅकमेल करायला सुरवात केली. ती छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी दिली. पैसे दिले नाही तर डॉक्टरच्या रुग्णालयात, वैद्यकीय परिषदेत ही छायाचित्रे पाठविण्याची धमकी दिली. त्या धमकीला बळी पडून डॉक्टरने ७ एप्रिल ते ३० जुलै या कालावधीत तब्बल ४२ वेळा तिला एकूण ९५ लाख रुपये पाठवले.
एका ग्रुप फोटोमुळे बिंग फुटले
तक्रारदार डॉक्टरने सौम्याला ज्या बॅंकेच्या खात्यात पैसे पाठवले त्यात सौम्या ऐवजी जास्मिन कौर असे नाव दिसले. त्यामुळे डॉक्टरला संशय आला. डॉक्टरने तिचे इन्स्टाग्राम खाते तपासले. त्यात सार्थक जैन नावाचा एक प्रोफाईल दिसला. त्याने त्यावर जाऊन तपासले असता एक ग्रुप फोटो दिसला. त्या फोटोत सौम्या उर्फ जास्मीन कौर दिसत होती. हा फोटो चंदिगढच्या पीजी गव्हर्ममेंट कॉलेज ऑफ आर्टस मधला होता. म्हणजे सौम्या अवस्थी ही जास्मिन कौर होती. ती वैद्यकीय महाविद्यालायत नाही तर कला महाविद्यालयात शिकत होती. दरम्यान, १२ ऑगस्ट रोजी सौम्या उर्फ जास्मिन कौरने डॉक्टरच्या पत्नीला फोन करून डॉक्टरबरोबरचे अश्लील संभाषण, चित्रफिती आणि छायाचित्र पाठवले.
मध्य सायबर विभागात गुन्हा दाखल
या फसवणुकीविरोधात डॉक्टरने मध्य सायबर विभाग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी या सौम्या अवस्थी उर्फ जास्मिन कौर या तरुणीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या फसवणुकीच्या कलम ३१८ (४),३१९(२) ३०८ (२) तसेच माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम ६६ (क), ६६ (ड) अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.