मुंबई : वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या १ हजार ४३२ पदांवर भरती करण्याच्या प्रस्तावाला मान्यता द्यावी, महागाई भत्ता लागू करावा, करोनाकाळात मानधनातून कापलेली रक्कम परत द्यावी, प्राध्यापकांची भरती करावी, वसतिगृहांची दुरुस्ती करावी आदी मागण्यांसाठी संपाचा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने दिला. मागण्या मान्य न झाल्यास २ जानेवारी २०२३ रोजी सकाळी आठ वाजल्यापासून राज्यातील सर्व रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग वगळता बाह्यरुग्ण विभाग व अन्य सर्व सेवा बंद करण्यात येतील, असे ‘मार्ड’कडून स्पष्ट करण्यात आले. 

निवासी डॉक्टरांना भेडसावणारे प्रश्न आणि त्यांच्या विविध मागण्या वैद्यकीय शिक्षण विभाग आणि मुंबई महापालिकेकडे ‘मार्ड’ने वारंवार मांडल्या आहेत. वरिष्ठ निवासी अधिकाऱ्यांच्या १ हजार ४३२ जागा निर्माण करण्यासंदर्भातील राज्य सरकार दरबारी रखडलेला प्रस्ताव तातडीने मान्य करावा, वैद्यकीय महाविद्यालयातील सहयोगी व साहाय्यक प्राध्यापकांची पदे लवकरात लवकर भरावी, १ जुलै २०१८ पासून जाहीर केलेला महागाई भत्ता मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांना लागू करावा, तसेच तेव्हापासूनची थकबाकीही देण्यात यावी, करोना कालावधीत नायर रुग्णालयातील डॉक्टरांच्या मानधनातून कापलेली १० हजार रुपयांची रक्कम लवकरात लवकर द्यावी, त्याचप्रमाणे कूपर व केईएम रुग्णालयातील निवासी डॉक्टरांची दोन महिन्यांच्या वेतनातील थकबाकी द्यावी आदी मागण्या वारंवार करण्यात येत आहेत. मात्र प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ‘मार्ड’कडून करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेसह राज्य सरकारच्या वैद्यकीय महाविद्यालयांतील अनेक वसतिगृहांची अवस्था दयनीय झाली आहे. त्यामुळे या वसतिगृहांची दुरुस्ती करावी. तसेच आवश्यक ठिकाणी तातडीने नवीन वसतिगृह बांधावी. तसेच वरिष्ठ निवासी डॉक्टरांच्या वेतनातील तफावत दूर करून राज्यातील सर्व वरिष्ठ निवासी डॉक्टरांचे वेतन एकसमान करावे आदी मागण्या ‘मार्ड’कडून करण्यात आल्या आहेत. मात्र त्याकडे महापालिका आणि राज्य प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात येत आहे.

या मागण्या तातडीने मान्य न झाल्यास २ जानेवारी रोजी सकाळी ८ वाजल्यापासून राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये बेमुदत संप पुकारण्याचा इशारा ‘मार्ड’ने दिला. त्यानुसार रुग्णालयांतील अतिदक्षता विभाग वगळता अन्य सर्व विभागांतील सेवा बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महापालिका ‘मार्ड’चे अध्यक्ष डॉ. प्रवीण ढगे यांनी दिली.