राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडेंवर जोरदार हल्ला केला आहे. समीर वानखेडे मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणाची चौकशी करत आहेत. राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाच्या कारभारावर गेले काही दिवस मलिक हे दररोज आरोप करीत आहेत. समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी करतानाच एनसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. मात्र वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मलिकांचे आरोप खोटे आणि विनोदी असल्याचे म्हटले आहे.

आर्यन खान याला ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक केल्यानंतर याच प्रकरणावरुन सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील वाद मागील काही आठवड्यांपासून सुरु आहेत. त्यातच मलिक यांनी काही दिवसांपूर्वी समीर वानखेडे हे मुस्लिम असून त्यांनी मुस्लिम असल्याचं लपवून नोकरीसाठी कागदपत्रांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा पहिल्या लग्नातील फोटो ट्वीटरवर शेअर करुन खळबळ उडवून दिली होती. दरम्यान दुसऱ्या एका ट्वीटमध्ये नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या जन्मदाखल्याचा फोटो शेअर करत इथूनच घोटाळा सुरु झाल्याचा आरोप केला होता. समीर वानखेडेंनी धर्म लपवून खोटे दाखले काढले आहेत, एका मागावर्गीयाचा अधिकार हिसकावून घेत आहेत आणि सत्यमेव जयेत म्हणत आहेत असे नवाब मलिक यांनी म्हटले होते.

त्यानंतर आता नवाब मलिक यांनी सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे निदर्शनास आल्यास तत्काळ राजीनामा देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. इंडिया टुडेशी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याकडून सादर केलेली कोणतीही कागदपत्रे बनावट असल्याचे आढळल्यास मी राजीनामा देण्यास तयार आहे. अन्यथा त्यांनी (समीर वानखेडे) राजीनामा द्यावा. माझ्या जावयाला अशाच प्रकरणामध्ये गोवण्यात आले होते आणि आता आर्यन खानलाही फसवण्यात आले आहे, असे नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राष्ट्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागावर (एनसीबी) होणारे आरोप, या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून होणारा पदाचा दुरुपयोग आदी तक्रारींबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधणार असल्याचे नवाब मलिक यांनी मंगळवारी सांगितले. समीर वानखेडे यांच्यावरील लाचखोरीच्या आरोपांची विशेष चौकशी पथकाकडून चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.