‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. अभय बंग यांची स्पष्टोक्ती

ग्रामीण भागातील नागरिक मंत्र-तंत्र, नवस यामध्ये अडकल्यामुळे तर दुसऱ्या बाजूला सरकारनेही हात वर केल्यामुळे महाराष्ट्रातील आरोग्य सेवा ‘भगवान भरोसे’ असून, अनाथ बनली आहे, असे स्पष्ट मत ‘शोधग्राम’चे संस्थापक डॉ. अभय बंग यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता’च्या आरोग्य विषयावरील ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात व्यक्त केले. राज्यातील बालमृत्यू, कुपोषण, सार्वजनिक आरोग्य व्यवस्था, मृत्यूची बदललेली कारणे आदी विषयांवरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. अर्थगतीच्या विकासाबरोबर कुपोषणाची गती कमी होत नसल्याबद्दल डॉ. बंग यांनी यावेळी खंत व्यक्त केली.

बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याचे अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. आजारांवर मात करण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्तम आरोग्य राखण्यासाठी नेमके काय करायला हवे, या व आरोग्यविषयक अन्य प्रश्नांचा आढावा घेण्यासाठी ५ व ६ डिसेंबर रोजी ‘लोकसत्ता’तर्फे ‘आरोग्याचे आरोग्य’ या विषयावर ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. अभय बंग यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये अतिशय प्रतिकूल परिस्थितीत रुग्णसेवेचे व्रत घेतलेले डॉ. अभय बंग यांनी बालमृत्यू, कुपोषण आणि झपाटय़ाने ऱ्हासाकडे चाललेल्या आरोग्य सेवेच्या स्थितीचे विदारक चित्र मांडले.

समाज तीन घटकांमध्ये विभागला गेला असून आरोग्य सेवेचे नियोजन करताना या तीन घटकांचा विचार करणे गरजेचे आहे. पूर्वी मंत्रतंत्र, नवस अशा कारणांमुळे आरोग्य सेवा ‘भगवान भरोसे’ होती. आता सरकारने हात वर केल्यामुळे ‘भगवान भरोसे’ आहे, अशी टीका डॉ. अभय बंग यांनी केली.

भारत  सरकार आणि सर्व राज्य सरकार मिळून प्रतिव्यक्ती सरासरी ११०० रुपये आरोग्यावर खर्च करतात. ढोबळ मानाने राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या एक टक्का आरोग्यावर खर्च केला जातो. भारतात आरोग्य सेवा कशी असावी याबाबत विचार करण्यासाठी पंतप्रधानांनी समिती स्थापन केली आहे. राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या ३ टक्के रक्कम आरोग्य सेवेवर खर्च करणे गरजेचे आहे अशी शिफारस या समितीने केली आहे. अमेरिकेत राष्ट्रीय सकल उत्पन्नाच्या १७ टक्के रक्कम आरोग्यावर खर्च केली जाते. अमेरिकेत आरोग्य सेवेवर दरडोई ९४०० डॉलर खर्च केले जातात. तर भारतामध्ये शासकीय व खासगी मिळून हा खर्च १०० डॉलर आहे. सरकारकडून एक टक्का आणि नागरिकांच्या खिशातून ३ टक्के असे एकूण चार टक्के खर्च आरोग्यावर केला जातो. शासन स्वत:च्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी सहा हजार रुपये खर्च करते. पण जनतेसाठी मात्र प्रतिव्यक्ती ११०० रुपये खर्च केला जातो. आरोग्य सेवेवरील शासकीय खर्च वाढविण्याची गरज आहे, असे डॉ. अभय बंग म्हणाले. आपले काम चोखपणे न करणारे वैद्यकीय प्राध्यापक, वैद्यक आदींबाबत डॉ. अभय बंग यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच वैद्यकीय सेवेसाठी नागरिकांनी विम्याचा पर्याय निवडावा; कंपन्यांनी कर्मचाऱ्यांच्या, तर सरकारने गरीबांच्या विम्याची जबाबदारी उचलावी, असेही त्यांनी सूचित केले.

गेल्या दोन दशकांमध्ये मृत्यूच्या कारणांमध्ये झपाटय़ाने परिवर्तन होत गेले. एकेकाळी प्लेग, पटकी, कुपोषण, हगवण यामुळे मृत्यू होत होते. मात्र आता हृदयरोग, लकवा, दमा, कर्करोग, आत्महत्या, व्यसन, मानसिक आजार, अपघात ही मृत्यूची कारणे बनली आहेत. एकेकाळी वर्षभरात तब्बल १ लाख ६७ हजार बालमृत्यू होत होते. मात्र आता ही संख्या ६० हजारांवर आली आहे. बालमृत्यूचे प्रमाण कमी झाले. मात्र कुपोषणाचे प्रमाण अतिशय संथगतीने कमी होत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न ६ ते १० टक्क्यांच्या दरम्यान होते. तर दरवर्षी बालमृत्यू पाच टक्क्यांनी, तर कुपोषण केवळ एक टक्क्याने कमी झाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले.

आजघडीला महाराष्ट्रात ३४ टक्के बालके कुपोषित आहेत. कुपोषणामुळे बुद्धी, मेंदू, आकलन, विकास यांचा विकास खुंटतो. आजघडीला महाराष्ट्रातील सुशिक्षित वर्ग आणि कुपोषित वर्ग एकाच रांगेत आहे. त्यामुळे भविष्यात भारताला आणि महाराष्ट्राला कुपोषणाचा धोका भेडसावण्याची शक्यता आहे, अशी चिंता डॉ. अभय बंग यांनी व्यक्त केली. कुपोषणामुळे समाजासाठी निर्माण होणारे धोकेही त्यांनी यावेळी विशद केले.

निरक्षरता, स्त्रियांचे प्रश्न, शासकीय भ्रष्टाचार अशा विविध सामाजिक आणि आर्थिक कारणांच्या साखळीमुळे कुपोषित बालकांना वाचविणे अवघड बनले आहे, असे सांगून डॉ. अभय बंग म्हणाले की, प्रदूषण, अस्वच्छता, व्यायामाचा अभाव, तंबाखू, अल्कोहोल, जंतूदोष, मानसिक ताण ही जागतिक अनारोग्याची प्रमुख कारणे आहेत. बालकांचे कुपोषण आणि खेडय़ात हागणदारीमुळे होणारी घाण हीदेखील रोगराईची कारणे आहेत. शहरीकरण झाले, जीवनमान बदलले आणि त्याबरोबर रोगराईचे प्रकार बदलत गेले, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात गेल्या वेळी ‘लघुउद्योग : क्षमता आणि आव्हाने’ या विषयावर झालेल्या चर्चासत्रावरील पुस्तिकेचे यावेळी डॉ. अभय बंग यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण सहसंचालक डॉ. तात्याराव लहाने, ‘लोकसत्ता’च्या प्रकाशिका वैदेही ठकार, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, प्रिन्स अली खान रुग्णालयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय ओक, ‘केसरी’चे प्रमोद दळवी, राज्याचे आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार उपस्थित होते.