मुंबई : डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणात नायर रुग्णालयाच्या संबंधित विभागाच्या तत्कालीन प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. चिंग लिंग चुंग चियांग या देखील आता आरोपी असणार आहेत. त्यांना आरोपी करण्याची सरकारी पक्षाने केलेली मागणी विशेष न्यायालयात मान्य केली.डॉ. पायल यांनी वारंवार तक्रारी करूनही डॉक्टर चिंग यांनी तिन्ही आरोपी डॉक्टरांविरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे, आरोपींनी डॉ.पायल यांना त्रास देणे सुरूच ठेवले, असा दावा सरकारी पक्षाने उपरोक्त मागणी करताना केला होता.

विशेष न्यायालयाने सरकारी पक्षाची ही मागणी मान्य केली.दरम्यान, डॉ. अंकिता खंडेलवाल, डॉ. भक्ती मेहेरे आणि डॉ. हेमा अहुजा या तिघींवर डॉ. पायल यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप आहे. या तिघींना उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यानंतर, या तिघींनी त्यांना प्रकरणातून दोषमुक्त करण्याची मागणी विशेष न्यायालयात केली होती. ती मान्य करण्यास विशेष न्यायालयाने नकार दिला होता.

डॉ. पायल तणावाखाली होत्या आणि कामाचा ताण सहन करू शकल्या नाहीत. त्याच कारणास्तव त्यांनी आत्महत्या केल्याचे भरपूर पुरावे आहेत, असा दावा आरोपींनी दोषमुक्तीची मागणी करताना केला होता. पायल अनुसूचित जमातीतील असल्याची आपल्याला कुठल्याही प्रकारची कल्पना नव्हती. त्यामुळे, जातीवरून तिची छळवणूक केल्याचा आणि तिला आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा आरोप तथ्यहीन असल्याचा दावाही तिघींनी केला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

डॉ. पायल हिने २२ मे २०१९ रोजी नायर रुग्णालयाच्या वसतिगृहामध्ये गळफास लावून आत्महत्या केली होती. तिच्यावर सतत जातीवाचक शेरेबाजी करुन तिचा मानसिक छळ केल्यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केला. त्यानंतर, पोलिसांनी या प्रकरणी आरोपींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये (अॅट्रोसिटी) गुन्हा दाखल केला होता.