कला वक्तृत्वाची : डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

प्रखर बुद्धिवादी, राष्ट्रीय विचारवंत, समाजशिक्षक, ग्रंथकार, अभ्यासू वक्ते असलेले डॉ. पुरुषोत्तम गणेश सहस्रबुद्धे यांनी ‘लोकसत्तेला दंडसत्तेचे आव्हान’ या विषयावर आठ व्याख्याने दिली होती. यापैकी सहा व्याख्यानांमध्ये त्यांनी ‘भारतीय लोकसत्तेच्या सामर्थ्यां’चे मूल्यमापन केले होते. त्यातील ‘राष्ट्रीय स्वार्थाची उपासना’ या व्याख्यानातील काही भाग.

१९५४ सालीच चीनने भारताचा सीमाप्रांत बळकावला होता. आपल्या पंतप्रधानांनी काही राजकीय धोरणाने ते भारताच्या नागरिकांना कळू दिले नाही इतकेच. पण नव्याने उघडकीस आलेल्या सत्यामुळे या आक्रमणाचे स्वरूप जास्त भयानक आहे असे ठरते. चीनमध्ये कम्युनिस्टांची सत्ता १९४९ मध्ये प्रस्थापित झाली आणि त्यानंतर अवघ्या पाच वर्षांत भारतासारख्या एका मोठय़ा राष्ट्राला शह देण्याइतके सामथ्र्य, इतका आत्मविश्वास चीनला प्राप्त व्हावा हे जितके आश्चर्यकारक तितकेच भारताच्या दृष्टीने लज्जास्पद आहे. आपल्याला स्वातंत्र्य मिळून बारा वर्षे झाली, पण आपला एकही प्रश्न सोडविण्यात आपल्याला यश आलेले नाही. गोवा, काश्मीर हे प्रश्न बाजूलाच राहिले. पाकिस्तानकडून आपले कर्ज वसूल करण्याचे सुद्धा सामथ्र्य आपल्यात नाही. आणि चीनला मात्र चार-पाच वर्षांत भारताच्या सरहद्दीत घुसून केवळ भारताच्या नव्हे तर सर्व जगाच्या छातीवर पाय देण्याइतके सामथ्र्य प्राप्त करून घेण्यात यश आले आहे. आपले राष्ट्र नुकतेच स्वतंत्र झाले आहे तेव्हा इतक्यातच आक्रमणामुळे निर्माण होणारा संघर्ष आपण ओढवून घेतला तर आपला नाश होईल ही भीती चीनला नाही. आपण केलेला मनसुबा ‘युनो’ संघटनेला अमान्य झाला तर जगातली अनेक बलाढय़ राष्ट्रे आपल्याविरुद्ध उठतील याची चीनला पर्वा नाही आणि भारतावर स्वारी केली तर तो प्रतिकार करील आणि मग मोठे रणकंदन माजेल ही चिंता तर स्वप्नातसुद्धा चीनच्या मनाला स्पर्श करीत नाही. चीन व पाकिस्तानच्या दृष्टीने भारत हा इतका प्रतिकारशून्य, इतका दुबळा ठरला आहे. आम्ही आत्मरक्षणाला पूर्ण समर्थ आहोत असे भारताचे शास्ते सर्वाना कंठरवाने सांगत आहेत. पण आपल्या स्त्रियांची विटंबना, सरहद्दीचा भंग व तेथील नागरिकांची मानखंडना, विवस्त्र होत असलेल्या द्रौपदीकडे शांतपणे पाहणाऱ्या धर्मराजाच्या शांतपणाने भारत पाहात उभा असताना, या घोषणांना वल्गनांपेक्षा जास्त किंमत द्यावी असे कोणालाच वाटत नाही. अर्थात या संयमामुळे, या शांततावादामुळे जगात भारताची कीर्ती पसरत चालली आहे हे खरे आहे. पण कीर्ती आणि सामथ्र्य यात फरक आहे हे आपण जाणले पाहिजे.

स्वार्थ, सत्तालोभ, धनक्षोभ, जातीयता या दुर्धर रोगांनी काँग्रेसला ग्रासले आहे. त्यामुळे राष्ट्रसेवा करण्याचे सामथ्र्यच तिच्या ठायी राहिलेले नाही. आपल्या कार्यक्षमतेचा हिशेब केला तर ती शून्यावर येऊन ठेपली आहे असे दिसते. आपल्याला साधे हिशेबसुद्धा नीट करता येत नाहीत. मग ठरल्या वेळात, ठरलेल्या भांडवलात एखादी योजना यशस्वी करून दाखविणे लांबच राहिले. आपल्या रेल्वे, आपले कारखाने, आपली शेती, आपली रुग्णालये याविषयी सरकारने नेमलेल्या समित्यांचे अहवाल पाहिले तर उधळपट्टी, विध्वंस, कर्तव्यशून्यता हीच आपल्या अठरा कारखान्यांची लक्षणे होऊन बसलेली दिसतात.

आपण धर्महीन, चारित्र्यहीन तरी का झालो याचा आपण विचार केला पाहिजे. स्वातंत्र्याआधीच्या वीस-पंचवीस वर्षांत आपण अनेक सत्याग्रहसंग्राम केले होते. त्यावेळी राष्ट्राच्या हाकेला साद देऊन लक्षावधी लोक संग्रामात उतरले आणि ध्येयवादाने प्रेरित होऊन त्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान केले. गेल्या शंभर वर्षांच्या काळात रानडे, टिळक, आगरकर, लाला लजपतराय, गांधी, पटेल, नेहरू, सुभाषचंद्र यासारखे अव्वल दर्जाचे श्रेष्ठ नेते भारताने निर्माण केले आणि त्यांच्या संदेशाने प्रेरित होऊन अखिल भारतभर हिंडून, सरकारी रोषाची पर्वा न करता लोकजागृती करणारे तरुण तर प्रत्येक प्रांतात सहस्रसंख्येने निर्माण झाले होते. हे सर्व लोक आता कोठे गेले? सत्ता-मोहिनीचे दर्शन होताच हे सर्व पतित आणि भ्रष्ट झालेत काय? स्वातंत्र्यसंग्रामात निर्माण झालेले ते शुभ्र चारित्र्य, तो ध्येयवाद, ते असामान्य कर्तृत्व एकाएकी अगदी निपटून नष्ट व्हावे याला केवळ सत्तालोभ, स्वार्थ ही कारणमीमांसा पुरेशी नाही असे वाटते. रशियात, चीनमध्ये राज्यक्रांती झाली, पण सत्ता हाती आल्यामुळे तेथल्या नेत्यांच्या कर्तृत्वाचा व चारित्र्याचा इतका लोप केव्हाही झाला नाही. मग भारतातच तसे का व्हावे? आपला ध्येयवाद इतका तकलुपी, इतका दिखाऊ होता काय? कीर्ती, सत्ता, धन यांचा मोह जिंकण्याचे सामथ्र्यच भारतीयांच्या ठायी नाही काय? असे म्हणवत नाही. याची काहीतरी निराळी कारणे असली पाहिजेत. तीच आता शोधायची आहेत..

प्रायोजक : ‘लोकसत्ता’ आयोजित आणि ‘वीणा वर्ल्ड’ प्रस्तुत व पॉवर्ड बाय ‘बँक ऑफ महाराष्ट्र’, ‘द विश्वेश्वर को-ऑ. बँक लिमिटेड’ पुणे, ‘आयसीडी’ औरंगाबाद (इन्स्टिटय़ूट ऑफ करिअर डेव्हलपमेंट), ‘एमआयटी’ औरंगाबाद.

 

(डॉ. पु. ग. सहस्रबुद्धे विचारमंच व त्यांचे समग्र साहित्य असलेल्या https://sites.google.com/site/drpgsahasrabudhevicharmanch/home या संकेतस्थळावरून साभार)

संकलन –  शेखर जोशी

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr p g sahasrabuddhe
First published on: 11-02-2017 at 00:01 IST