बाबा आमटेंच्या आनंदवनात गेले १२ दिवस दृष्टिदानाचा यज्ञ सुरू होता. गावखेडय़ातून अक्षरश: हजारो लोक या यज्ञासाठी आले होते. आपल्या डोळ्यावर निश्चत उपचार होणार.. आपल्याला दिसायला लागणार.. आपला ‘लहानूबाबा’ आला, याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. उन्हातान्हाची ना त्यांना पर्वा होती ना उपचार करणाऱ्या डॉक्टरांना.. तब्बल बारा दिवस.. दिवसाला अठरा तास काम चालले होते. या काळात बारा हजार रुग्णांना तपासण्यात आले, तर १७९७ रुग्णांवर नेत्र शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यात ८८ कुष्ठरुग्णांच्या मोतिबिंदूच्या शस्त्रक्रिया झाल्या, तर दोन्ही डोळ्यांनी अंध असलेल्या ११७ रुग्णांना शस्त्रक्रियेनंतर दृष्टी मिळाली.

चंद्रपूरमधील वरोरा येथील ‘आनंदवन’साठी हा दृष्टियज्ञ तसा नवीन नाही. गेली १६ वर्षे अखंडपणे हा यज्ञ सुरू आहे. लहानूबाबा येणार म्हटल्यानंतर आजूबाजूच्या शेकडो गावातून लोकांची एकच जत्रा येथे उसळत असते. यावेळीही २६ नोव्हेंबरपासून ६ डिसेंबपर्यंत चाललेल्या या यज्ञामध्ये येथील सुमारे ६४० गावांमधून तब्बल १२ हजार लोकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. यामध्ये आनंदवनातील १९०० कुष्ठरुग्णांचाही समावेश होता. जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाते व ज्येष्ठ नेत्र शल्यचिकित्सक डॉ. तात्याराव लहाने आणि विभागप्रमुख डॉ. रागिणी पारेख यांच्यासह डॉ. विजय पोळ आणि त्यांचे सर्व सहकारी दिवसाचे १८ तास काम करत होते. या काळात १७९७ रुग्णांच्या मोतिबिंदूच्या तसेच नाशरूच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. डॉ. रागिनी यांनी ७२३, तर डॉ. लहाने यांनी ७६४ शस्त्रक्रिया केल्या. एकूण २७०० रुग्णांना मोफत चश्मे देण्यात आले असून यात नऊशे कुष्ठरुग्णांचा समावेश आहे. गेले तीन महिने या शिबिरासाठी आमची तयारी सुरू होती, असे सांगून डॉ. लहाने म्हणाले की, मुंबईतील ‘आय केअर’ संस्थेचे अस्लम, शब्बीर, जोहर आणि मुस्तफा यांची मोलाची मदत झाली. १२ डिसेंबपर्यंत या सर्वाची नियमित तपासणी केली असून, जेवढय़ा शस्त्रक्रिया केल्या त्या सर्वच्या सर्व यशस्वी झाल्याचे डॉ. लहाने यांनी सांगितले.

गावखेडय़ातील अनेकांना वृद्धत्वामुळे तसेच आर्थिक परिस्थितीअभावी मुंबई-पुण्यात शस्त्रक्रियेसाठी येणे शक्य नसते, अशा रुग्णांवर उपचार करण्याचा, त्यातही ‘आनंदवन’ येथे जाऊन सेवा करण्याचा आनंद काही वेगळाच आहे.
– डॉ. रागिणी पारेख