‘ड्रंक अॅीण्ड ड्राइव्ह’च्या अपघातांचे सहा महिन्यांत १२ बळी

मुंबईत दारूच्या नशेत वाहन हाकणाऱ्या तळीरामांना ताळ्यावर आणण्यासाठी कठोर कारवाईचा बडगा उगारूनही स्वत:बरोबरच इतरांच्या जीवाशी खेळण्याचा हा खेळ थांबलेला नाही. उलट गेल्या वर्षीच्या तुलनेत या जीवघेण्या अपघातांची संख्या वाढलेली आहे. गेले संपूर्ण वर्ष मिळून १४ जणांना दारूच्या नशेत वाहन हाकणाऱ्यांच्या गाडीखाली नाहक जीव गमवावा लागला होता. यंदा अवघ्या सहाच महिन्यात ही संख्या १२वर गेली आहे.

मुंबईत वाहनांच्या वाढत्या संख्येबरोबरच वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहन हाकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. साधारणपणे वर्षांला २० लाखांच्या आसपास प्रकरणे वाहतुकीचे नियम पायदळी तुडविल्याबद्दल नोंदविली जातात. यात दारू पिऊन वाहन हाकणाऱ्यांचे प्रमाण तसे नगण्य आहे. मात्र, जीवघेण्या ठरणाऱ्या अपघातांमध्ये दारू पिऊन वाहन चालविल्यामुळे झालेल्या अपघातांचे प्रमाण सर्वाधिक आहे. या संबंधात मुंबईचे पोलीस सहआयुक्त (वाहतूक) मिलिंद भारांबे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी मुंबई पोलिसांनी तळीराम वाहनचालकांच्या विरोधातील कारवाई अधिक कडक केली असल्याचे सांगितले. ‘पूर्वी केवळ शनिवारी-रविवारी ही कारवाई होत असे. परंतु, आता मुंबईतील वाढलेली वाहतूक पाहता आम्ही आठवडाभर दिवसरात्र अशा वाहनचालकांना अटकाव करून कारवाई करीत असतो. त्यामुळे मुंबईत अशा वाहनचालकांना निश्चितपणे जरब बसली आहे,’ असा दावा भारांबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केला.

गेल्या वर्षी अशा तब्बल १७,८६९ जणांना दारू पिऊन वाहन चालविल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला होता. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी अशा दोन महिन्यातच ही संख्या ३,८९४ इतकी झाली आहे. अर्थातच त्यामुळे जीवघेणे, गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरणारे अपघातही वाढले आहेत.

विहार दुर्वे यांनी माहितीच्या अधिकारात मुंबई पोलिसांच्या

वाहतूक शाखेकडून मिळविलेल्या महितीनुसार दारूच्या नशेत वाहन चालविल्यामुळे झालेल्या एकूण ३८ अपघातांची नोंद २०१३मध्ये झाली होती. परंतु, दरवर्षी ही संख्या लक्षणीय वाढते आहे.

नावे कधी जाहीर करणार?

दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना ताळ्यावर आणण्याकरिता राज्याचे माजी पोलिस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी त्यांची नावे संकेतस्थळावर प्रसिद्ध करून त्यांचे जाहीर वाभाडे काढण्याची भूमिका घेतली होती. पुण्यात हीच कार्यपद्धती अवलंबण्यात येते. परंतु, मुंबईत अद्याप या दृष्टीने काहीच हालचाली झालेल्या नाहीत.