मुंबई : अमली पदार्थ विक्री व निर्मितीत गुंतलेल्यांना यापुढे ‘महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमा’न्वये (मकोका) कारवाई करण्यात येणार आहे. त्यासंदर्भातल्या सुधारणा विधेयकास बुधवारी विधानसभेने मंजुरी दिली.
गृहराज्य मंत्री योगेश कदम यांनी सुधारणा विधेयक सादर केले. राज्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची निर्मिती, वाहतूक व विक्री होत आहे. पाच वर्षात याप्रकरणी ७३ हजार गुन्हे नोंद असून १० हजार कोटींचे अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.
हे प्रमाण यापुढे वाढणार आहे. ‘मकोका’ लावण्यासाठी सदर व्यक्ती हिंसक कारवायांमध्ये सहभागी असणे आवश्यक होते. त्यामध्ये आता सुधारणा केली असून अमली पदार्थ कारवायांमध्ये गुंतलेल्यांना हा कायला लावला जाईल, या कायद्यामुळे गुन्हेगारांचे जाळे नष्ट होणार आहे, असे मंत्री कदम यांनी सांगितले.
‘एनडीपीएस’ अधिनियम यापुढेही अमली पदार्थ निर्मिती व तस्कारांना लागू असणार आहे. मात्र ‘मकोका’मुळे वाढत्या अंमली पदार्थ विक्रीस आळा बसणे शक्य आहे.
अमली पदार्थ तस्करांचे जाळे ‘मकोका’ कायदा उद्ध्वस्त करेल. मकोका कायदा लावण्यापूर्वी पोलीस आयुक्तांची संमती लागणार आहे. संघटीत गुन्हेगारीची व्याख्या या सुधारणा विधेयकामुळे अधिक स्पष्ट झाली आहे, असे मंत्री कदम म्हणाले.
या विधेयकावरील चर्चेत अमीत साटम, सुधीर मुनगंटीवार, प्रविण दटके आदिंनी भाग घेतला. एकमताने सदर विधेयक संमत झाले.