मुंबई: मुलुंड परिसरात दारूच्या नशेत भरधाव वेगात गाडी चालवणाऱ्या तिघांनी शुक्रवारी रात्री दुभाजकाला धडक दिली. त्यात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले असून मुलुंड पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. मुलुंड- गोरेगाव लिंक रोड परिसरात एक अपघात झाला असून अपघातग्रस्तांना मदतीची गरज असल्याचा संदेश मुलुंड पोलिसांना नियंत्रण कक्षाकडून देण्यात आला. त्यानुसार तत्काळ घटनास्थळी मुलुंड पोलिसांचे एक पथक दाखल झाले. यावेळी याठिकाणी दुचाकीवरून आलेल्या तिघांनी भरधाव वेगात दुभाजकाला धडक दिली होती. त्यात दोघे गंभीर जखमी झाले होते. एकजण रस्त्यालगत बसून पोलिसांची वाट पाहत होता.

हेही वाचा >>> निवडणूक निर्णय अधिकारी अचानक मतमोजणीच्या आदल्या दिवशी पडले आजारी 

पोलिसांनी तत्काळ त्यातील दोघांना मुलुंडमधील अगरवाल रुग्णालयात दाखल केले. मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शीव रुग्णालयात दाखल करण्याचा सल्ला येथील डॉक्टरांनी दिला. त्यावेळी किरकोळ जखमी असलेल्या दिलबर सिंह याच्याकडे चौकशी केली असता, तिघेही दारूच्या नशेत धुंद असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. दुचाकीवर तिघेही बसून मुलुंड पश्चिम परिसरात जात असताना चालक रोहित जैस्वाल याचा गाडीवरील ताबा सुटला. त्यानंतर ही गाडी दुभाजकाला जाऊन धडकली. यामध्ये स्वतः चालक आणि अभिषेक यादव हे दोघे जखमी झाले आहेत. मुलुंड पोलिसांनी याबाबत चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.