ओशिवरा येथील सनदी अधिकाऱ्यांच्या मीरा सोसायटीत आढळलेल्या ‘सेक्स रॅकेट’मुळे सनदी अधिकारी अस्वस्थ झाले आहेत. उपनगरात असलेल्या सनदी अधिकाऱ्यांच्या इमारतींमधील फ्लॅट भाडय़ाने दिलेले असल्यामुळे त्यांनी आता आपले भाडेकरू असले धंदे करीत नाहीत ना, याची चाचपणी आपल्या एजंटांकडे करायला सुरुवात केली आहे. असे एखादे रॅकेट आपल्या नावे असलेल्या फ्लॅटमध्ये उघड झाले तर आपली बदनामी होईल, या भीतीने आता हे सनदी अधिकारी सतर्क झाले आहेत.
जुहू-अंधेरी-ओशिवरा परिसरात सनदी अधिकाऱ्यांच्या मीरासह पाटलीपुत्र, संगम, वसुंधरा आदी सोसायटय़ा आहेत. या सोसायटय़ांमधील ९० टक्के सदनिका भाडय़ाने देण्यात आल्या आहेत. अनेक दिग्गज अधिकाऱ्यांच्याया सदनिका प्रामुख्याने कंपन्यांच्या नावे दोन-तीन वर्षांच्या करारावर भाडय़ाने देण्यात आल्या आहेत. त्यामुळे या सनदी अधिकाऱ्यांना तीन वर्षांचे भाडे एकरकमी मिळत असे. मात्र अशा सदनिकांमध्ये काही गैरप्रकार होत असतील तर मालक या नात्याने जबाबदारी आहे, याची जाणीव असल्यानेच आता या सनदी अधिकाऱ्यांनी चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सनदी अधिकाऱ्यांनी आपल्या सदनिका काही ‘पब्लिक रिलेशन्स’ वा इव्हेन्ट मॅनेजमेंट कंपनीला दिले आहेत. कंपनीचे अनेक बडे अधिकारी मुंबईत असताना या सदनिका वापरतात. तर काही ठिकाणी पाटर्य़ासाठी या सदनिकांचा वापर होतो. आयपीएस अधिकाऱ्यांचे प्राबल्य असलेल्या एका सोसायटीत सध्या नवी दिल्लीतून प्रतिनियुक्तीवर असलेल्या एका आयएएस अधिकाऱ्याच्या सदनिकेमध्ये दररोज रात्री उशिरापर्यंत धांगडधिंगा सुरू असल्याच्या तक्रारी झाल्यानंतर संबंधित भाडेकरूस बाहेर काढण्यात आले होते. या ठिकाणीही उच्चभ्रू सेक्स रॅकेट असण्याची शक्यता वर्तविली जात होती. ओशिवरातील सेक्स रॅकेट उघड झाल्यानंतर मात्र हे सनदी अधिकारी धास्तावले आहेत.
सनदी अधिकाऱ्यांच्या वास्तव्यासाठी प्रसिद्ध असलेल्या ओशिवरा येथील मीरा टॉवर या इमारतीतील एका सदनिकेमध्ये चालणारे सेक्स रॅकेट पोलिसांनी गुरुवारी उघडकीस आणले. आयएएस-आयपीएस अधिकाऱ्यांच्या या इमारतीत रात्री नऊच्या सुमारास बनावट ग्राहक पाठवून केलेल्या कारवाईत पाच वेश्यांना अटक केली. या वेश्या मालिकांमधून कामे करणाऱ्या पाच मॉडेल्स असल्याचे समजते. या वेश्यांबरोबरच एका खासगी कंपनीचा व्यवस्थापक व दलाल या दोघांनाही ताब्यात घेण्यात आले होते.