मुंबई : अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीसाठी घरोघरी रांधल्या जाणाऱ्या फराळाचा दरवळ यंदा परदेशस्थित आप्तांपर्यंत पोहोचण्यास यंदा उशीर होण्याची शक्यता आहे. कॅनडा-भारतातील तणाव, सुरू असलेले युद्ध या पार्श्वभूमीवर यंदा अनेक देशांमध्ये फराळाचे टपाल पोहोचण्यास आठ ते पंधरा दिवस लागत आहेत. त्यामुळे दिवाळीपूर्वी परदेशी फराळ पोहोचणार का असा प्रश्न नागरिक आणि व्यावसायिकांना पडला आहे.

परदेशात व्यवसाय, शिक्षण, नोकरीसाठी राहणाऱ्या नागरिकांना आवर्जून भारतातून फराळ पाठवला जातो. दरवर्षी दिवाळीपूर्वी पंधरा दिवस टपाल कंपन्यांकडून फराळ पाठवण्यासाठी सवलती, स्वतंत्र कक्ष असा जामानिमा केला जातो. परदेशातील बहुतेक देशांमध्ये एरव्ही साधारण पाच ते सहा दिवसांत फराळाचे टपाल पोहोचते. त्यामुळे दिवाळीच्या आदल्या आठवड्यात ताजा फराळ पाठवण्याकडे सर्वाधिक कल असतो. यंदामात्र अनेक देशांमध्ये दिवाळीपूर्वी फराळ पोहोचणे अवघड झाले आहे. कॅनडा आणि भारतात तणाव आहे. तसेच इस्राईलमधील युद्धामुळे आखाती देशांमध्येही फराळ पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता आहे. सध्या साधारण आठ ते दहा दिवसांचा कालावधीही लागू शकतो. सध्याच्या परिस्थितीमध्ये सामानाची कसून तपासणी होत आहे. त्यामुळे त्या प्रक्रियेत काही दिवस वाढू शकतात, असे खासगी टपाल कंपन्यांतील (कुरिअर) कर्मचाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा – मुंबई : आकाश कंदिलावर जरतारीचा मोर… खण, पैठणी, म्हैसूर सिल्कपासून तयार केलेल्या कंदिलांना मागणी

टपाल साधारण चार, पाच दिवसांत पोहोचायचे आता मात्र जास्त कालावधी जाणार आहे. शक्यतो दिवाळीपूर्वी पाच ते सहा दिवस अगोदर फराळ पाठवायला सुरुवात होते. पार्सल पोहोचविण्यास इतके दिवस जातील याची नेमकी कल्पना येत नसल्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे, असे डिटीडीसी एक्स्प्रेस कंपनीचे शशिकांत परब यांनी सांगितले.

दरवर्षी मुंबईतून मोठ्या प्रमाणात परदेशात फराळ पाठवला जातो. परदेशात नोकरी करणाऱ्या आप्तेष्टांसाठी मुंबईकर नागरिक फराळ पाठवत असतात. चार ते पाच दिवसांच्या आत हे फराळाचे पदार्थ परदेशात पोहोचत होते. दरम्यान, इस्रायल युद्धाच्या पार्श्वभूमीवर फराळ पोहोचण्यासाठी आठ ते बारा दिवसांचा कालावधी लागणार आहे. टपाल कंपन्यांतर्फे अमेरिका, कॅनडा, युरोपमधील देश, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका ,जपान, इंडोनेशिया, सिंगापूर आणि आखाती देशांत मोठ्या प्रमाणावर फराळ आणि भेटवस्तू पाठवण्यात येतात. मुंबईतील विविध खासगी टपाल कंपन्यांच्या शाखांतून दररोज ६० ते ७० किलो फराळ जगभरातील वेगवेगळ्या देशांत जात आहे. बहुतेक कंपन्यांनी ९ नोव्हेंबरपर्यंत सवलत जाहीर केली आहे.

हेही वाचा – मुंबई : शिंदे गटाच्या वाढत्या बळाची भाजपामधील इच्छुकांना चिंता, युती आणि आरक्षणावर भवितव्य अवलंबून

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केवळ आखाती देश आणि कॅनडा या ठिकाणी पाठविले जाणारे टपाल उशिराने पोहोचणार आहेत. इतके दिवस लागतील याची कल्पना नव्हती मात्र सुरक्षेच्या दृष्टीने हा वेळ लागणार आहे. कारण तिकडच्या सर्व सोयीसुविधा स्थिरस्थावर होईपर्यंत वेळेची अडचण उद्भवेल. त्यामुळे ग्राहकांनी नेहमीपेक्षा लवकर टपाल पाठवण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. – संतोष खंडागळे, तेज कुरिअर्स