मुंबई : जगप्रसिद्ध ‘कोल्ड प्ले’ या ब्रिटिश सांगीतिक वाद्यवृंदाने भारतीयांना भुरळ घातली असून मुंबई व अहमदाबाद येथे झालेल्या कार्यक्रमांना युवा वर्गाने मोठी गर्दी केली होती. या उत्साही माहौलमध्ये ‘कोल्ड प्ले’च्या मंचावर प्रसिद्ध गायक ख्रिस मार्टिन हा ‘गुड फिलिंग्स’ हे गाणे सादर करत असताना मराठमोळे शब्दभ्रमकार व बाहुलीकार सत्यजित रामदास पाध्ये आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या बोलक्या बाहुल्यांचे सादरीकरण लक्षवेधी ठरले.

‘कोल्ड प्ले’ या ब्रिटिश वाद्यवृंदाचा ‘म्युझिक ऑफ द स्फेअर्स – वर्ल्ड टूर’अंतर्गत नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर १८, १९ व २१ जानेवारी रोजी आणि २५ व २६ जानेवारी रोजी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर कार्यक्रम रंगला. भारतातील या पाचही कार्यक्रमात ‘गुड फिलिंग्स’ हे चार मिनिटांचे गाणे सादर होत असताना ‘मपेट्स’ या अमेरिकन बोलक्या बाहुल्यांचे सादरीकरण करण्यासाठी सत्यजित पाध्ये, कैलाश टिके, कौस्तुभ माळकर आणि सुशांत बने यांची निवड करण्यात आली होती. प्रसिद्ध जिम हेनसन कंपनीतील अमेरिकन पपेटियर निकॉलेट आणि ड्रू यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशिक्षणातून सत्यजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हे जादुई सादरीकरण केले. विशेष बाब म्हणजे सत्यजित पाध्ये यांनी स्वतःच्या ‘बंड्या’ या बोलक्या बाहुल्याला कार्यक्रमस्थळी नेत ‘कोल्ड प्ले’मधील ‘अ स्काय फुल ऑफ स्टार्स’ या गाण्याचे सादरीकरण करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

‘कोल्ड प्ले’ हा ब्रिटिश वाद्यवृंद जगभर कार्यक्रमांसाठी फिरतो, तेव्हा संबंधित देशातील बाहुलीकारांची निवड करण्यात येते. या अनुषंगाने भारतातील पाचही कार्यक्रमांसाठी सत्यजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांची निवड करण्यात आली होती. ‘कोल्ड प्ले’ अंतर्गतच्या ‘द विअरडोस’ या अमेरिकन बोलक्या बाहुल्यांच्या संचात गायिका एंजल मून, ड्रमर डोंक, गिटारिस्ट स्पार्कमन व पियानोवादक वीझड यांचा समावेश होता आणि या चारही बाहुल्यांच्या हातात प्रतिकात्मक वाद्ये होती. हे चारही बोलके बाहुले निकॉलेट आणि ड्रू, तसेच सत्यजित आणि त्यांचे सहकारी, अशा सहा जणांनी हाताळले. या सादरीकरणासाठी सत्यजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अमेरिकन कंपनीने पाठविलेल्या चित्रफिती पाहून ऑनलाईन माध्यमातून सराव केला. तसेच नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियमवर प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी १८ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता पोहोचल्यानंतर निकॉलेट आणि ड्रू यांनी त्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण दिले. यावेळी सत्यजित आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सादरीकरणाने सर्वांनाच भुरळ घातली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जगप्रसिद्ध ‘कोल्ड प्ले’मधील बोलक्या बाहुल्यांच्या सादरीकरणासाठी मराठमोळ्या शब्दभ्रमकार व बाहुलीकारांची निवड झाल्यामुळे मी भारावून गेलो. ‘कोल्ड प्ले’ने बोलक्या बाहुल्यांना महत्त्व दिल्याचा आनंद आहे आणि त्यांनी या कार्यक्रमादरम्यान आम्हा कलाकारांची व्यवस्थित व्यवस्था करण्यासह योग्य मान दिला. यावेळी ख्रिस मार्टिनला सादरीकरण करताना जवळून पाहता आले आणि भारतात झालेल्या या सर्वात मोठ्या ‘कोल्ड प्ले’च्या कार्यक्रमाचा भाग झाल्याचा आनंद आहे. – सत्यजित रामदास पाध्ये, शब्दभ्रमकार व बाहुलीकार