मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्राचे प्राध्यापक डॉ. नीरज हातेकर यांच्यावरील निलंबनाच्या कारवाईविरोधात जगदीश भगवती, अभिजीत बॅनर्जी, अशोक कोतवाल, अरविंद पंगारिया यांच्यासह ३० जागतिक कीर्तीच्या अर्थशास्त्रज्ञांनीही आपला निषेधाचा सूर मिसळल्याने विद्यार्थी-प्राध्यापकांच्या आंदोलनाला आणखी धार आली आहे. विद्यापीठ ही निर्भयपणे सत्याचा पुरस्कार करण्याची जागा आहे. पण, हातेकरांवरील कारवाई मुस्कटदाबी करणारी असून शैक्षणिक स्वातंत्र्य आणि उच्चशिक्षण संस्थांच्या प्रतिष्ठेला धोका पोहोचविणारी आहे. हा एक अत्यंत धोकादायक व अस्वस्थ करणारा पायंडा असून आम्ही त्याचा तीव्र निषेध करतो, अशा शब्दांत जागतिक कीर्तीच्या जवळपास ३० अर्थतज्ज्ञांनी हातेकर यांच्यावरील कारवाईचा निषेध केला आहे.
‘हातेकर हे उत्तम दर्जाची शैक्षणिक कामगिरी असलेले प्राध्यापक असून आमचे सहकारी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाचे गैरव्यवस्थापन, बेकायदेशीर बाबींविषयी जाहीरपणे टीका केली. पण, त्यांचे हे वर्तन खोटे प्रचारतंत्र करणारे आणि नैतिक अध:पतन ठरवून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मतभेद असणाऱ्यांची या पद्धतीने मुस्कटदाबी करणे चुकीचे असून त्यांच्या निलंबनाविरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आमचाही पाठिंबा आहे, अशा शब्दांत या अर्थतज्ज्ञांनी डॉ. हातेकर यांच्यावरील कारवाईला विरोध केला आहे.
‘हातेकर यांनी केलेल्या आरोपांचा खरेखोटेपणा तपासणे आम्हाला शक्य नाही. परंतु, विद्यापीठाचे एक नामवंत प्राध्यापक म्हणून त्यांनी उपस्थित केलेले प्रश्न विद्यापीठाने गांभीर्याने घ्यायला हवे होते. हातेकर यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याऐवजी त्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर चौकशी करण्यासाठी एखादी स्वतंत्र समिती विद्यापीठाने नेमायला हवी होती. खुद्द कुलगुरू वेळुकर यांच्यावरच गैरकारभाराचे गंभीर आरोप आहेत. त्यामुळे या प्रकरणात त्यांच्याकडून नि:पक्षपातीपणाची अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

विद्यापीठाबाहेर हातेकर यांचा ‘निषेधवर्ग’
आपल्या निलंबनामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून डॉ. नीरज हातेकर मंगळवारपासून मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलाच्या प्रवेशद्वारावरच विद्यार्थ्यांचे वर्ग घेणार आहेत. दुपारी ३ ते सायंकाळी ५ असे दोन तास हातेकर यांचे वर्ग येथे होतील. प्राध्यापक म्हणून हातेकर यांचे महत्त्व अधोरेखित करणारे हे प्रतीकात्मक आंदोलन मंगळवारी विद्यापीठात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे. निलंबनानंतर डॉ. हातेकर यांचे वर्ग घेणे बंद झाले. त्यामुळे आम्हाला किमान विद्यापीठाबाहेर तरी शिकवा, अशी विनंती विद्यार्थ्यांनी हातेकर यांना केली होती. विद्यार्थ्यांच्या या विनंतीवरून आता प्रा. हातेकर यांनी विद्यापीठाबाहेरच वर्ग घ्यायचे ठरविले आहे. शाहीर संभाजी भगतदेखील या वेळी उपस्थित राहून प्रा. हातेकर यांना आपला पाठिंबा दर्शवतील.