मुंबईः सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) मुंबई विभागाने ११७ कोटी रुपयांच्या बँक फसवणूकीप्रकरणी अमित अशोक थेपडे याला रविवारी अटक केली. कॅनरा बँकेशी संबंधित तब्बल ११७ कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) २००२ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.

थेपडे बराच काळ ईडीचा ससेमिरा चुकवून पळत होता. अखेर तो दक्षिण मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून राहत असल्याची माहिती ईडीला मिळाली. त्या माहितीच्या आधारे अखेर ईडीने त्याला अटक केली.

याप्रकरणी ईडीने माहितीच्या आधारावर हॉटेलमध्ये छापा टाकला. याप्रकरणी ईडीने ५० हून अधिक बँक खाती गोठवली, साडे नऊ लाखांची रोकड, दोन कोटी ३३ लाख रुपयांचे सोने, दागिने व हिरे जडीत दागिने, दोन वाहने तसेच आर्थिक व्यवहारांचे पुरावे असलेली डिजिटल उपकरणे जप्त केली. विशेष पीएमएलए न्यायालयाने थेपडेला पाच दिवसांच्या ईडी कोठडीत पाठविले आहे. याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.

केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी) यांनी गॅलेक्सी कन्स्ट्रक्शन अँड कॉन्ट्रॅक्टर्स प्रा. लि.आणि मित्सॉम एंटरप्रायझेस प्रा. लि. विरुद्ध गुन्हे नोंदवले होते. या दोन्ही कंपन्या थेपडेच्या मालकीच्या असून त्यांनी कॅनरा बँकेकडून कर्ज घेण्यासाठी विविध स्थावर मालमत्ता गहाण ठेवल्या होत्या. मात्र, चौकशीनुसार, त्या मालमत्ता आधीच विकलेल्या अथवा अनेक ठिकाणी गहाण ठेवल्याचे निष्पन्न झाले. अशाप्रकारे आरोपीने बँकेची ११७ कोटी सहा लाख रुपयांची फसवूक केल्याचा आरोप आहे.

तपासानुसार आरोपीने कर्जाच्या रकमांचा वैयक्तिक वापरासाठी अपहार केला. तसेच ईडीने याप्रकरणी अधिक चौकशी केली असता अमित थेपडेने बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या निधी गुंतवला आहे. तसेच रक्कम विविध ठिकाणी गुंतवण्यासाठी व व्यवहारात आणण्यासाठी अनेक बेकायदा व्यवहार केले आहेत. त्या व्यवहाराच्या जाळ्याची माहिती ईडीच्या हाती लागली असून तज्ज्ञांच्या मदतीने त्याची तपासणी सुरू आहे. पण आरोपीने गैरव्यवहारातून कमावलेली रक्कम मालमत्तांमध्ये गुंतवून ती कायदेशीर दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

ईडीने याप्रकरणी केलेल्या आर्थिक तपासणी व पडताळणीत आरोपीने अनेक संशयास्पद व्यवहार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्यामुळे त्याला अटक करणे आवश्यक होते. पण आरोपी ईडीचा ससेमिरा चुकवत होता. अखेर दोन महिन्यानंतर त्यांना मुंबईतू अटक करण्यात आली. आरोपी सध्या ईडी कोठडीत असून याप्रकरणी ईडी अधिक तपास करत आहे.