मुंबई : खिचडी वितरणातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची आणि मृतदेहाच्या पिशव्या खरेदीप्रकरणी माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) मंगळवारी स्वतंत्रपणे जवळपास सात तास चौकशी केली.

पेडणेकर यांची २३ नोव्हेंबरला ईडीने त्यांची चौकशी केली होती. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्ट २०२३ रोजी पेडणेकर यांच्यासह वेदान्त इनोटेक प्रा. लि, तत्कालिन अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त, मध्यवर्ती खरेदी विभागाचे (सीपीडी) तत्कालिन उपायुक्त व अनोळखी सरकारी कर्मचारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ४९ लाख ६३ हजार रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. महानगरपालिकेने ८ मार्च २०२० रोजी मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्या खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा >>> परमबीर सिंग यांच्या विरोधातील खंडणीप्रकरण : तपास बंद करण्याचा अहवाल ‘सीबीआय’कडून सादर

सर्व पाहणी केल्यानंतर १६ मार्च रोजी वेदान्त इनोटेक प्रा. लि. कंपनीला ६,७१९ रुपये प्रति पिशवी खरेदीचे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ११ मे रोजी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी वेदान्तसह आणखी एका कंपनीला अंतिम करण्यात आले होते; पण त्यावेळी तत्कालिन महापौर किशोरी पेडणेकर यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला भायखळा येथील बंगल्यावर बोलावून वेदान्त इनोटेकलाच कंत्राट देण्यास सांगितले, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने जबाबात सांगितले होते. त्यानंतर याप्रकरणी ईडीनेही गुन्हा दाखल करून तपासाला सुरूवात केली. संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांनीही यापूर्वी खिचडी वितरणातील कथित गैरव्यवहाराप्रकरणी चौकशी केली होती. टाळेबंदीच्या काळात गरीब, मजुरांना खिचडी वाटप करण्यात आले होते. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘खिचडी घोटाळयातील लाभार्थी सत्ताधारी’

मुंबई: मुंबई पालिकेत खिचडी घोटाळा झाला असेल तर त्याचे खरे लाभार्थी हे भाजप व शिंदे गटात आहेत. १२० कंत्राटदारांनी खिचडी वाटप केली होती, पण कारवाई ठाकरे गटाशी संबंधित कंत्राटदारांवर केली जात आहे. तथाकथित खिचडी घोटाळयातील दोन कंत्राटदारांचे कंत्राट देवगिरी व वर्षांवर आजही सुरू आहे. शिंदे गटाचा एक खासदार या कंत्राटदारांशी संबंधित आहे. असा आरोप  खासदार संजय राऊत यांनी केला. मुंबई पालिकेच्या खिचडी घोटाळयात राऊत यांचे बंधू संदीप यांची सक्त वसुली संचालनालयाकडून चौकशी सुरू आहे. त्यावर राऊत यांनी संताप व्यक्त केला.