मुंबई : करोना काळात मृतदेह ठेवण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या पिशव्याप्रकरणी सक्तवसुली संचलनालयाने(ईडी) माजी महापौर किशोरी पेडणेकर व अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलारसू यांना समन्स बजावले आहे. वेलरासू यांना मंगळवारी, तर पेडणेकर यांना बुधवारी चौकशीला बोलावण्यात आहे. त्यांना बेलार्ड पियर येथील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगितल्याचे सूत्रांनी सांगितले. महापालिकेने ८ मार्च २०२० मध्ये मृतदेह ठेवण्यासाठी एक हजार पिशव्यांच्या खरेदीचा निर्णय घेतला होता.
हेही वाचा >>> बांधकाम साहित्य वाहतुकीवर बंदीचा न्यायालयाचा इशारा; चार दिवसांत हवेचा दर्जा न सुधारल्यास आदेश देण्याचे सुतोवाच
सर्व पाहणी केल्यानंतर १६ मार्च रोजी वेदान्त इनोटेक प्रा. लि. कंपनीला ६ हजार ७१९ रुपये प्रति पिशवीप्रमाणे कंत्राट देण्यात आले होते. त्यानंतर पुन्हा ११ मे रोजी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यावेळी वेदान्तसह आणखी एका कंपनीला अंतिम करण्यात आले होते; पण त्यावेळी पेडणेकर यांनी महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला भायखळा येथील बंगल्यावर बोलावून वेदान्त इनोटेकलाच कंत्राट देण्यास सांगितले, असे एका वैद्यकीय अधिकाऱ्याने जबाबात सांगितले आहे. त्याच्याच आधारे आर्थिक गुन्हे शाखेने ५ ऑगस्टला गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी ईडीनेही नुकताच गुन्हा दाखल केला होता.