गुन्हेगारांच्या माहितीची डिजिटल देवाण-घेवाण प्रभावी

सराईत गुन्हेगारांना आळा बसावा आणि शहरातील गंभीर गुन्ह्यांची उकल व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी डिजिटल देवाण-घेवाण उपक्रम सुरू केला आहे.

मुंबई पोलिसांच्या नव्या उपक्रमातून ४४ गुन्ह्यांची उकल; दूरचित्र संवादाच्या माध्यमातून प्रत्येक पोलीस ठाण्याला गुन्हेगाराची माहिती

अनिश पाटील
मुंबई : सराईत गुन्हेगारांना आळा बसावा आणि शहरातील गंभीर गुन्ह्यांची उकल व्हावी यासाठी मुंबई पोलिसांनी डिजिटल देवाण-घेवाण उपक्रम सुरू केला आहे. त्या अंतर्गत अटक करण्यात आलेला सराईत आरोपी आणि त्यांच्या कार्यपद्धतीची माहिती आता दूरचित्र संवादाच्या माध्यमातून शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्याला दिली जाते. मुंबई पोलिसांच्या या नव्या उपक्रमातून आतापर्यंत ४४ गुन्ह्यांची उकल झाली आहे.

करोनाकाळात पोलिसांनी त्यांच्या कार्यपद्धतीतही अनेक बदल केले आहेत. अंतर नियमांचे पालन करण्यासाठी अनेक कामे डिजिटल करण्यात आली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून मुंबईत डिजिटल देवाण-घेवाण  उपक्रम सुरू करण्यात आला. नव्याने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमातून दीड महिन्यातच ४४ गुन्ह्यांची उकल झाली आहे. या उपक्रमाच्या आतापर्यंत पाच बैठका झाल्या असून त्यात अटक करण्यात आलेल्या ३०२ सराईत आरोपी आणि त्यांची माहिती डिजिटल माध्यमातून आदान-प्रदान करण्यात आली. यापूर्वी लेखी पत्रकाद्वारे सराईत आरोपींच्या माहितीचे आदान-प्रदान केले जायचे. पण आता डिजिटल देवाण-घेवाणीद्वारे प्रत्येक पोलीस ठाण्याच्या प्रतिनिधींसमोर सराईत आरोपींना हजर केले जाते. त्यामुळे आपली ओळख लपवणाऱ्या गुन्हेगारांचीही ओळख पटण्यास मदत होत आहे. सोनसाखळी चोरी, जबरी चोरीसह अपहरणाचे गुन्हेही या उपक्रमातून सुटले आहेत. घाटकोपर येथील पंतनगर परिसरात पूर्व द्रुतगती मार्गावर ज्येष्ठ महिलेची सोनसाखळी रक्षाबंधनच्या दिवशी दोन आरोपींनी हिसकावली होती. त्याच वेळी परिसरात तीन चोऱ्या झाल्या होत्या. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी पुढे हैदरअली शेरअली सारंग आणि मोहम्मद हुसेन हाजी हानिफ हाकम या दोघांना अटक केली. डिजिटल देवाण-घेवाण उपक्रमाअंतर्गत शहरातील सर्व पोलीस ठाण्यांना त्यांची माहिती देण्यात आली होती. त्यावेळी या आरोपींचा साकीनाका, कुर्ला, विलेपार्ले आदी पोलीस ठाण्यातील सात गुन्ह्य़ांमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. अशाच प्रकारे वांद्रे पोलिसांनी अपहरणाच्या गुन्ह्यांत अटक केलेल्या आरोपीचा आणखी एका अपहरणाच्या गुन्ह्यातही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उपक्रम काय?

  • शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात ३० जुलैपासून दर शुक्रवारी दूर चित्रसंवादाच्या माध्यमातून विशेष बैठकीचे आयोजन केले जाते.
  •  त्यात प्रत्येक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अन्वेषण अधिकारी, प्रतिबंधात्मक अधिकारी, इतर अधिकारी उपस्थित असतात.
  • यावेळी प्रत्येक पोलीस ठाणे त्यांनी अटक केलेला सराईत गुन्हेगार, त्याचा पत्ता, कार्यपद्धती व गुन्ह्यांचे ठिकाण आदी माहिती इतर पोलीस ठाण्यांच्या प्रतिनिधींना देतात.

सराईत आरोपींच्या होणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी मुंबईतील प्रत्येक पोलीस ठाण्यात डिजिटल आदान-प्रदान उपक्रम सुरू करण्यात आला असून त्यामुळे इतर गुन्हेही सोडवण्यात यश आले आहे.

– विश्वास नांगरे-पाटील, सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Effective digital exchange criminal information ssh