मुंबई : रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम असतानाच स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाची संधी आदिती तटकरे यांना देण्यात आल्याने शिवसेना शिंदे गटात कमालीची अस्वस्थता पसरली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व भरत गोगावले हे दोघे अनुपस्थित होते. नाराज गोगावले यांनी नवी दिल्लीत जाऊन भाजपचे अध्यक्ष जयप्रकाश नड्डा यांची भेट घेतली.

पालकमंत्रीपदाला स्थगिती असतानाही गिरीश महाजन यांना नाशिक तर आदिती तटकरे यांना रायगडमध्ये ध्वजारोहणाचा मान मिळाल्याने महायुतीतील वाद अधिकच चिघळला. आदिती तटकरे यांच्या नावाची घोेषणा होताच मंत्री भरत गोगावले प्रचंड नाराज झाले. त्यांनी आपली नाराजी एकनाथ शिंदे यांना कळवली. मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री शिंदे व गोगावले हे दोघेही अनुपस्थित होते. शिंदे हे जम्मूमध्ये असल्याचे सांगण्यात आले. गोगावले यांनी शिंदे यांच्या सूचनेवरून नवी दिल्लीत जाऊन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांची भेट घेत आपली नाराजी त्यांच्याकडे व्यक्त केली.

दरम्यान, रायगडच्या पालकमंत्रीपदाचा तिढा सुटलेला नसताना मुख्यमंत्र्यांनी रायगडमध्ये आदिती तटकरे व गोगावले यांच्याऐवजी त्रयस्थाकडे ही जबाबदारी सोपविली असती तर अधिक चांगले झाले असते. याबाबतची नाराजी शिंदे यांनी वरिष्ठांच्या कानावर घातल्याचे शिवसेनेच्या एका ज्येष्ठ मंत्र्याने सांगितले.

झेंडावंदनाची संधी मिळाली म्हणजे पालकमंत्रीपद मिळाले असे नाही. आपण पालकमंत्रीपदावर आजही १०० टक्के ठाम आहोत. वरिष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य असेल. – भरत गोगावले, फलोत्पादन मंत्री

गोगावलेंसाठी आग्रही

ध्वजारोहणासाठी प्रसिद्ध झालेली यादी ही पालकमंत्रीपदाची नाही. ध्वजारोहण प्रत्येक जिल्ह्यात कोण कुठे करणार आहे, याबाबतची यादी प्रसिद्ध झाली आहे. भरत गोगावले हेच रायगडचे पालकमंत्री व्हावेत यासाठी आम्ही आग्रही असल्याचे शिंदे गटाचे प्रवक्ते आणि मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. तर नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असलेले मंत्री दादा भुसे यांनीही याबाबतचे सर्व निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेत असतात. आपण नाराज नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.