राज्यातील शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार शाब्दिक हल्ला चढवला जात आहे. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी तर महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता राज्यात थेट राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली. यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते शनिवारी (१५ जुलै) नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यानंतर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत होते.

एकनाथ शिंदे म्हणाले, “अरे आमच्याकडे २१० आमदार आहेत. ही मागणी हास्यास्पद आहे. मंत्री राहिलेला माणूसाने सत्ताधाऱ्यांकडे २१० आमदारांचं संख्याबळ असताना राष्ट्रपती राजवटीची मागणी करणं हास्यस्पद आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व असतं.”

व्हिडीओ पाहा :

“सरकारला २१० आमदारांचे पाठबळ”

“राज्य आणि केंद्रातील विकासाने प्रभावित होऊन राष्ट्रवादी काँग्रेसनेही या सरकारला पाठिंबा दिला असून तिन्ही पक्षांनी मिळून आता मार्गक्रमण करायचे आहे. याक्षणी सरकारला २१० आमदारांचे पाठबळ असून भक्कमपणे सरकारची वाटचाल पुढे सुरू आहे,” असं मत एकनाथ शिंदेंनी व्यक्त केलं.

“लागेल तेवढा निधी कोणतीही काटछाट न करता मिळतोय”

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ नेतृत्वाखाली देशाची वाटचाल सुरू असून देशविदेशात त्यांना मिळणारा सन्मान हा भारतीय म्हणून आपली मान उंचावणारा आहे. राज्याच्या प्रगतीसाठी केंद्राची आपल्याला भक्कम साथ मिळाली आहे. रेल्वेमार्ग उभारणी, पायाभूत सुविधा, नगरविकास यासाठी लागेल तेवढा निधी कोणतीही काटछाट न करता आपल्याला मिळत आहे,” असंही एकनाथ शिंदेंनी नवी मुंबईत बोलताना नमूद केलं.

हेही वाचा : “सगळे अजित पवार रेटून नेतात असं सांगतात”, देवेंद्र फडणवीसांसमोर एकनाथ शिंदे म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कार्यकर्ता मेळावा आणि नागरिक सत्कार सोहळ्यासाठी उपस्थित होते. या मेळाव्यासाठी शिवसैनिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले. यावेळी भव्य पुष्पहार, ढोल ताशांचा गजर आणि जेसीबीच्या सहाय्याने पुष्पवृष्टी करत मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. सत्तांतरानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पहिल्यांदाच नवी मुंबईत कार्यकर्ता मेळाव्याला उपस्थित राहिले.