गेल्या तीन महिन्यांपासून राज्यात ठाकरे गट विरुद्ध शिंदे गट यांच्यात राजकीय कलगीतुरा चालू असल्याचं पाहायला मिळत आहे. भाजपासह सत्ता स्थापन केल्यानंतर शिंदे गटावर ठाकरे गटाकडून सातत्याने खोके सरकार किंवा गद्दार सरकार अशी टीका केली जात आहे. या पार्श्वभूमीवर तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील सर्व बंडखोर गुवाहाटीला गेल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होताना पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाचे आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये दाखल होत असून या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. शिंदे गटातील ६ आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्यामुळे तर्क-वितर्क लढवले जात असताना त्यावर मंत्री उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

उदय सामंतांच्या विधानामुळे चर्चांना उधाण!

शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी जवळपास पाच ते सहा आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे. वैयक्तिक कारणांमुळे हे आमदार येत नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात असताना त्यावरून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी गुवाहाटीला रवाना होण्यापूर्वी विमानतळावर माध्यमांशी बोलताना मोठा दावा केला आहे. “चर्चा काहीही असो, आम्ही सगळे एकसंघ आहोत. येताना कदाचित आमच्यासोबत जास्त लोक असतील”, असं उदय सामंत म्हणाले आहेत. त्यामुळे ठाकरे गटातून अजून काही लोक शिंदे गटात जाण्याची चर्चा सुरू झाली आहे.

“अरे हे काय चाललंय तुमचं?” अजित पवारांना संजय शिरसाटांचा सवाल; गुवाहाटी दौऱ्यावर दिलं प्रत्युत्तर!

मध्यावधी निवडणुकांवरूनही टोला!

दरम्यान, ठाकरे गटाकडून मध्यावधी निवडणुकांविषयी दावे केले जात असून लवकरच या निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर उदय सामंत यांनी खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. “मला वाटतं मध्यावधी निवडणुका लागण्याचा प्रश्नच येत नाही. काही लोकांना भीती वाटते की आपल्याकडचे लोक इकडे-तिकडे जातील की काय! त्यामुळे त्यांचं मनोधैर्य वाढवण्यासाठी हे सगळं चाललंय. सत्ता येणार आहे हे त्यांना कायमस्वरूपी सांगत राहण्यासाठी असं बोललं जातं. यामागे फार मोठं राजकारण आहे”, असं उदय सामंत म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अजित पवारांचा खोचक टोला!

शिंदे गटातील आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटीत दाखल झाले असून कामाख्या देवीच्या दर्शनाला ते जाणार आहेत. तीन महिन्यांपूर्वी बोललेला नवस फेडण्यासाठी पुन्हा गुवाहाटी दौऱ्यावर जात असल्याची प्रतिक्रिया शिंदे गटातील आमदारांकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापलं असून विरोधी पक्षनेते अजित पवारांनी शुक्रवारी माध्यमांशी बोलताना या दौऱ्यावर खोचक टीका केली आहे. “”ते कामाख्या देवीच्या दर्शनाला चालले आहेत. काही ठिकाणी आपण बकरं कापतो, काही ठिकाणी कोंबडी कापतो. तसं तिथं रेडा कापला जातो म्हणतात. रेड्याचा बळी देतात. आता हे कुणाचा बळी द्यायला चालले आहेत ते माहिती नाही. पण जर दर्शनाच्या कामाला चालले असतील तर आपण एकमेकांना शुभेच्छाच देतो”, असं अजित पवार म्हणाले होते.