श्रीकांत शिंदे यांच्या लग्नपत्रिकेच्या निमित्ताने जंगी सोहळ्याची झलक

सार्वजनिक बांधकाममंत्री व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार श्रीकांत यांच्या १७ नोव्हेंबरला रंगणाऱ्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने मुंबईकर व ठाणेकरांना खास ‘शिंदेशाही’ थाट पाहायला मिळणार आहे. या लग्नसोहळ्याचे आवतण देणारी तब्बल अर्धा किलोहून अधिक वजनाची झकपक पत्रिका धाडून शिंदे यांनी या जंगी सोहळ्याची छोटीशी झलकच निमंत्रितांना पाठविली आहे.

मुंबईतील मरिन लाइन्सच्या पारशी जिमखान्यात सायंकाळी सात वाजता श्रीकांत यांच्या लग्नाचा ‘स्वागत समारंभ’ रंगणार आहे. त्याचे निमंत्रण देणारी ही पत्रिका आहे, परंतु पत्रिकेचा थाट एखाद्या कॉफीटेबल बुकप्रमाणे अवाढव्य आहे. उंचीला जवळपास एक फूट असणाऱ्या या पत्रिकेचे वजनच अर्धा किलोहून अधिक आहे. पत्रिकेच्या एकूण थाटावरून शिंदे यांच्या लग्नात कोणतीच कसर पडू दिली जाणार नसल्याचे दिसून येते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एरवी साधी राहणी, उच्च विचारसरणीचा आग्रह धरणारी राजकीय मंडळी आपले कौटुंबिक सोहळे साजरे करताना दौलतजादा करताना दिसतात. यापूर्वीही अनेक राजकीय पुढाऱ्यांनी शाही पद्धतीने आपल्या आप्तेष्टांचे लग्नसोहळे केल्याची उदाहरणे आहेत. काही वर्षांपूर्वी राज्याचे तत्कालीन नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी आपल्या मुलाच्या लग्नसोहळ्यात केलेली दौलतजादा राज्यात चर्चेचा विषय ठरली होती. आता त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) आणि ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनीदेखील आपल्या खासदार सुपुत्राचा लग्न सोहळा ‘शिंदेशाही’ थाटात करण्याचे ठरवलेले दिसते. अन्य राजकीय पुढाऱ्यांच्या पावलावर पाऊल टाकून हा लग्नविधी जोरदार होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.विशेष म्हणजे, o्रीकांत शिंदे यांचा साखरपुडा समारंभही शाही थाटात पार पडला होता. त्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नामवंतांनी हजेरी लावली होती.

दरम्यान, याबाबत सोहळ्याचे उत्सवमूर्ती व खासदार श्रीकांत शिंदे यांना विचारले असता लग्नसोहळा साध्या पद्धतीनेच होणार असल्याचे ते म्हणाले. ‘आमच्या वैयक्तिक आयुष्यात शिरकाव करू नका. ही पत्रिका ठरावीक निमंत्रितांसाठी आहे,’ असेही शिंदे यांनी सांगितले.