‘मुंबई महापालिका निवडणुका जवळ आल्या की मराठीबद्दल, महाराष्ट्राबद्दल अपप्रचार केला जातो, ते बरोबर नाही. वरून कीर्तन, आतून तमाशा असा हा प्रकार आहे. हिंदीसक्तीचं नरेटिव्ह सांगितलं जात आहे. मराठी माणसाला सत्य कळलं आहे. आपणच मंजूर केलेल्या गोष्टीविरुद्ध मोर्चा काढला गेला. मराठी माणूस आता फसणार नाही. तुमच्या मनातला ‘म’ मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे. म मलिद्याचा आहे, म मतलबाचा आहे आणि म मतांचा आहे. तुमच्या मनात मतांचं राजकारण आहे’, अशी टीका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. पहिलीपासून हिंदीसक्तीच्या मुद्यावरून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले होते. त्यासंदर्भात शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. विधान परिषदेत बोलताना शिंदे यांनी हिंदीसक्तीचं नरेटिव्ह लादलं जात आहे असंही सांगितलं.
ते म्हणाले, ‘मी हे बोलणार नव्हतो पण तो विषय निघाला. त्यामुळे मला हे बोलावं लागतं. मी नेहमी सांगतो, मला बोलायला भाग पाडू नका. माझ्याकडे बोलण्यासारखं खूप काही आहे. परंतु जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मी बोलतो. संयम राखतो. आरोपांना आरोपांनी उत्तर देत नाही. आरोपांना कामाने उत्तर देणारा कार्यकर्ता आहे. म्हणूनच विधानसभा निवडणुकीत एवढा मोठा विजय मिळाला आहे’.
‘मराठी भाषा आमचा श्वास आहे. मराठी माणूस श्वास आहे. हिंदुत्व आमचा प्राण आहे. लपवाछपवीचं कामच नाहीये. जी भूमिका घेतली ती सरळसोट आहे. कोणीही शंका बाळगण्याचं कारण नाही’, असं ते म्हणाले.
‘मराठी माणसासाठी अभिमानाचं प्रतीक असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा सूचीत समाविष्ट केलं. मराठी माणसाची मान उंचावण्याचं काम केलं आहे. जगभरातले लोक छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले किल्ले पाहण्यासाठी येतील. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जगभर पोहोचेल’, असं त्यांनी सांगितलं.
‘महापालिकेच्या शाळा बंद करून इंटरनॅशनल स्कूल आम्ही सुरू करू शकत नाही. मराठीचं प्रेम आम्हाला तरी कोणी शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही जन्मलो मराठी, शिकलो मराठीत, मराठीतच जगणार आणि मराठीसाठीच खपणार हे मी सांगू इच्छितो’, असं ते म्हणाले.