‘आम आदमी पक्षा’चे (आप) नेते प्रा. योगेंद्र यादव यांच्यावर शनिवारी जंतरमंतर मैदानावर त्यांच्याच पक्षाच्या एका कार्यकर्त्यांने शाई फेकली. या प्रकारानंतर आपच्या कार्यकर्त्यांनी शाई फेकणाऱ्या या तरुणाला बेदम मारहाण केली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन राममनोहर लोहिया रुग्णालयात दाखल केले आहे.
‘महिला दिना’निमित्त जंतरमंतर मैदानावर आपने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमानंतर प्रा. यादव प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असतानाच सागर भंडारी या कार्यकर्त्यांने ‘भारत माता की जय’ अशी घोषणाबाजी करून त्यांच्या चेहऱ्यावर शाई फेकली. आपच्या कामाविषयी आणि त्यांच्या नेत्यांविषयी असंतुष्ट असल्याने हे कृत्य केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले.
‘‘शाई फेकणारा तरुण कोण होता, ते माहीत नाही. मी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत असताना त्याने मागून हल्ला केला. त्याने पुढच्या वेळेला पुढून हल्ला करून दाखवावा,’’ असे प्रा. यादव या घटनेनंतर म्हणाले. ‘‘जेव्हा तुम्ही प्रस्थापितांना धक्का देता, तेव्हा अशा अनुभवांचा सामना करण्याची तयारी ठेवली पाहिजे. हे कुणाचेही कृत्य असू शकते. मला कुणालाही दोष द्यायचा नाही. शाई फेकण्याचा उद्देश मला कळला नाही. मात्र मी माझे काम करत राहीन,’’ असेही प्रा. यादव यांनी सांगितले. दरम्यान, आपच्या नेत्यांनी पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यास नकार दिला आहे. या घटनेनंतर आपचे काही नेते संसद मार्ग पोलीस ठाण्यात गेले आणि ‘एफआयआर दाखल करू नका’, असे त्यांनी पोलिसांना सांगितल़े
जेव्हा तुम्ही सत्कृत्याच्या मार्गाने जात असता, त्या वेळी तुम्हाला अशा प्रसंगांचा सामना करावाच लागतो. हे कृत्य करणाऱ्यांना माझे एकच सांगणे आहे की, आम्ही आमचा मार्ग बदलणार नाही.
अरविंद केजरीवाल, ‘आप’चे निमंत्रक़
भाजपवर आरोप
आपच्या नेत्या शाझिया इल्मी यांनी हा हल्ला भाजपकडून झाला असल्याचा आरोप केला. ‘‘प्रा. यादव यांच्यावर शाई फेकण्याचे कृत्य अत्यंत दुर्दैवी आणि संतापजनक आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी ते केले आहे,’’ असे इल्मी म्हणाल्या. भाजपचे दिल्लीतील प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन यांनी मात्र हा आरोप फेटाळून लावला आहे. ‘‘आपनेच हा हल्ला घडवून आणला असून, यातून त्यांचे ढोंगी राजकारण दिसून येत आहे, ’’ असे हर्षवर्धन यांनी सांगितले.