मुंबई: मुलुंडमध्ये पैशांचे वाटप होत असल्याच्या संशयावरून शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आले. यावेळी काही कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. निवडणूक अधिकाऱ्यांना धक्काबुक्की करणाऱ्या २० ते २५ जणांविरोधात मुलुंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मुलुंडमध्ये मोठ्या प्रमाणात पैशांचे वाटप करण्यात येत असल्याची चर्चा सुरू होती. त्यामुळे मुलुंड परिसरात शुक्रवारी सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते परस्परांसमोर ठाकले. यावेळी बराच गोंधळ झाला. या प्रकरणाची माहिती मिळताच मुलुंड पोलीस आणि निवडणूक अधिकारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या कार्यकर्त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करीत अधिकच गोंधळ घातला.

हेही वाचा >>>गेल्या पाच वर्षांत राज्यात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ; मात्र मृत्यूच्या संख्येत घट

याचदरम्यान काही कार्यकर्त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना धक्काबुकी केली. पोलिसांची अधिक कुमक मागविण्यात आली. याप्रकरणी निवडणूक अधिकाऱ्यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री उशिरा तक्रार दाखल केली. पोलिसांनी २० ते २५ जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून यापैकी काहींना ताब्यात घेण्यात आले आहे.