एल्फिन्स्टन रोड स्टेशनवरील (आताचे प्रभादेवी स्टेशन) चेंगराचेंगरीच्या घटनेचा तपास अखेर मुंबई पोलिसांनी बंद केला आहे. पोलीस रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद अपघात म्हणूनच कायम राहणार असून हा घातपात नसल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभरापूर्वी एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या पादचारी पुलावर चेंगराचेंगरीची घटना घडली होती. २९ सप्टेंबर रोजी सकाळी ही घटना घडली. या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाला. तर ३९ जण जखमी झाले होते. चेंगरीचेंगरीची घटना हा घातपात असू शकतो, अशी शंकाही व्यक्त करण्यात आली होती. मुंबई पोलिसांनी या घटनेचा जवळपास वर्षभर सर्व बाजूंनी तपास केला. प्रत्येक पैलू पोलिसांनी तपासून बघितला. मात्र, यातून घातपात असल्याचे सिद्ध होईल, असा कोणताही पुरावा समोर आलेला नाही.

सहपोलीस आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) देवेन भारती यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’ला याबाबत माहिती दिली. ‘चेंगराचेंगरीची घटना ही अफवेमुळे घडली. पादचारी पुलाच्या जिन्यावर थांबलेल्या लोकांमध्ये अफवा पसरली आणि ही घटना घडली. पोलीस रेकॉर्डमध्ये या घटनेची नोंद अपघाती मृत्यू अशी असेल, असे त्यांनी सांगितले. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पश्चिम रेल्वेच्या मुख्य सुरक्षा अधिकाऱ्यांनी दिलेल्या अहवालातही पूल पडल्याची अफवाच चेंगराचेंगरीसाठी कारणीभूत ठरल्याचे नमूद करण्यात आले होते. पूल पडल्याची अफवा पसरली आणि त्यामुळेच गोंधळ उडाल्याचे सांगण्यात आले. शॉटसर्किट किंवा अन्य कोणतीही अफवा पसरली नव्हती, असे यात म्हटले होते.

पोलिसांनी तपासादरम्यान हवामान खात्याकडूनही माहिती मागवली होती. हवामान खात्याने दिलेल्या माहितीचाही पोलिसांच्या तपासात उल्लेख आहे. हवामान खाते आणि मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार सकाळी दहा नंतर जवळपास १५ मिनिटे मुसळधार पाऊस झाला. १५ दिवसानंतर पाऊस पडल्याने बहुतांशी प्रवाशांची तारांबळ उडाली होती. छत्री नसल्याने अनेक जण जिन्यावर तसेच पुलावर थांबले होते, असे यात म्हटले आहे.

गर्दी वाढत गेली आणि याच दरम्यान पुल कोसळल्याची अफवा पसरल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. एका प्रत्यक्षदर्शींनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, ‘एका व्यक्तीने ‘फूल गिर गया’ म्हटले. मात्र अनेकांनी ते ‘पूल गिर गया’ असे ऐकले. यामुळे चेंगराचेंगरी झाली. पोलिसांनी या प्रकरणात तब्बल १०० हून अधिक लोकांचे जबाब घेतले. यात चेंगराचेंगरीतून बचावलेले प्रवासी, रेल्वे सुरक्षा दलाचे जवान, लोहमार्ग पोलीस, स्टेशनवरील कर्मचारी आणि प्रत्यक्षदर्शींचा समावेश होता. सखोल तपासानंतर हा घातपात नव्हता हे स्पष्ट होते. या घटनेमागे कोणतेही षडयंत्र नव्हते. हा एक दुर्दैवी अपघातच होता, असे तपासाशी संबंधित पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, जिन्यावर सीसीटीव्ही नसल्याने तेथील फुटेज उपलब्ध होऊ शकले नाही.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Elphinstone road stampede mumbai police classify it as accident not criminal conspiracy
First published on: 28-09-2018 at 11:18 IST