पश्चिमेच्या समुद्राच्या दिशेने मावळतीच्या सूर्याचा प्रवास सुरू झाला आणि किनाऱ्यावरून वाहणाऱ्या वाऱ्यांची थंडाई वाढत चालली. नरिमन पॉइंटवरील एक्स्प्रेस टॉवर्सच्या दुसऱ्या मजल्यावरील हिरवळीवर झोके घेत गिरक्या मारणाऱ्या वाऱ्याच्या बोचऱ्या झोतांना एका आगळ्या उत्साहाची चाहूल कधीपासूनच बहुधा लागली होती. मुंबईच्या आणि तमाम महाराष्ट्राच्या मराठमोळ्या मनाचे नेमके प्रतिबिंब असलेल्या ‘लोकसत्ता’च्या वर्धापनदिनाच्या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठीच जणू वाऱ्याची प्रत्येक झुळूक कधीपासून हिरवळीच्या आसपासच ताटकळली होती.. संध्याकाळचे साडेपाच वाजले, तिन्हीसांजेची चाहूल सुरू झाली आणि हिरवळीवर नवा माहोल उदयाला येऊ लागला. ‘लोकसत्ता’च्या असंख्य, लाखो वाचकांचे आणि चाहत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वेगवेगळ्या क्षेत्रांतील व्यक्तींचे एक आगळे संमेलन हिरवळीवर सुरू झाले होते..
‘लोकसत्ता’च्या ६६ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या स्नेहसोहळ्याला राजकीय क्षेत्रातील दिग्गजांबरोबरच, साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांतील नामवंतांच्या हजेरीची झालर लागली होती. वर्धापनदिनानिमित्त प्रकाशित होणाऱ्या ‘लोकसत्ता’च्या विशेषांकाच्या अतिथी संपादक सई परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली, आजच्या स्त्रीच्या मर्यादा आणि भवितव्य या विषयावर परिसंवाद सुरू झाला. खरे तर, हा विषय नेहमीचाच.. या विषयावरील चर्चेलाही तोच तोपणा असणार, असा एक उगीचच असणारा समज.. पण, महिलांच्या कर्तृत्वाची क्षितिजे जेथे पोहोचू शकत नाहीत, असा समज असलेल्या वाइन निर्मितीच्या क्षेत्रात आपल्या कर्तबगारीचा ठसा उमटविणाऱ्या, ‘वाइन लेडी’ अशी स्वत:ची ओळख निर्माण करणाऱ्या अनुभवी उद्योजक अचला जोशी आणि अत्यंत प्रतिष्ठेचा असलेल्या ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारा’वर आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटविणाऱ्या शास्त्रज्ञ डॉ. शुभा टोळे यांच्या उपस्थितीत रंगलेल्या या परिसंवादाने, महिलांच्या कर्तृत्वाला मर्यादा नाहीत, हेच वास्तव अधोरेखित केले.. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या परिसंवादातील सहभाग हे कार्यक्रमाचे आणखी एक वेगळेपण तर ठरलेच, पण आपल्या आईच्या, प्रेमलाकाकी चव्हाण यांच्या जीवनातील यशाच्या प्रत्येक पायरीचा रंजक आढावा घेत मुख्यमंत्र्यांनीही याच वास्तवावर शिक्कामोर्तबही केले..
परिसंवादाच्या या कार्यक्रमानंतरच्या चहापानाच्या निमित्ताने, पुन्हा उपस्थितांच्या कार्यक्षेत्रांच्या सीमारेषा पुसल्या गेल्या.. राजकारण, समाजकारण, संस्कृती, साहित्य, कायदा आणि काव्य-नाटय़क्षेत्रातील दिग्गजांची एक अनौपचारिक मैफील सुरू झाली आणि गप्पांना बहर आला..
मोशे शेक यांच्या ‘मोशेज फाइन फूड्स प्रा. लि.’च्या लज्जतदार अल्पोपाहाराचा आस्वाद घेत बहरत चाललेल्या गप्पांच्या आणि हास्यविनोदाच्या फुलोऱ्यांनी एक्स्प्रेस टॉवर्सच्या हिरवळीला टवटवी आली, आणि बोचरे वारेही काही काळासाठी तिथेच रेंगाळून राहिले..