मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतलेली हिंदुत्वाची भूमिका आणि राज्याचा सर्वागिण विकास हाच आपल्या सरकारचा भर असेल. आम्हाला मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्याला भरभक्कम आणि मजबूत सरकार देणार असल्याचा निर्धार नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी केला.

नवे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यावर प्रथेप्रमाणे दोघांनीही मंत्रालयात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या तसबीरीला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर नव्या सरकारची पहिली मंत्रिमंडळ बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील पाऊस-पाणी, रखडलेले प्रकल्प आदींचा आढावा घेण्यात आला. 

मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना आपल्या सरकारचे संख्याबळ आता १७० च्या पुढे गेले असून अजूनही सर्व स्तरातून पाठिंबा मिळत आहे. आपल्यासोबत ५० आमदार असून या आमदारांना फोडण्याचा अनेक प्रकारे प्रयत्न केला. पण एकही आमदार फुटला नाही, असे सांगितले. राज्यातील रखडलेले प्रकल्प गतीमान करतानाच मुंबई- नागपूर समृद्धी महामार्ग हा गेमचेंजर प्रकल्प निर्धारित वेळेत पूर्ण होईल असा विश्वाह शिंदे यांनी व्यक्त केला. तर दोघे मिळून राज्याचा वेगाने विकास करू असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पाहा व्हिडीओ –

‘फडणवीसांनी मनाचा मोठेपणा दाखविला’

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेना कार्यकर्त्यांला मुख्यमंत्रीपद देऊन माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनाचा मोठेपणा दाखविला, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले. जेव्हा ५० आमदार वेगळा विचार करतात, तेव्हा आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांनी शिंदे यांच्या नावाची मुख्यमंत्रीपदासाठी घोषणा केल्यावर पत्रकारांशी बोलताना शिंदे म्हणाले, फडणवीस यांच्याकडे १२० चे संख्याबळ असताना त्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपद दिले. महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना अनेक अडचणी येत होत्या. मतदारसंघातील नागरिकांची कामे होत नव्हती, निधी मिळत नव्हता. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती. ग्रामपंचायत सदस्यांचाही विरोध होता. त्यामुळे वेगळा विचार करण्याची वेळ आली.