राजेश्वर ठाकरे, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ज्या विमान प्रवाशांना ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करायचे नसेल, त्यांच्यासाठी स्व-घोषणापत्र भरून देण्याचा पर्याय आहे. मात्र, मुंबई विमानतळावरील कर्मचारी  ‘आरोग्य सेतू’ अ‍ॅप डाऊनलोड करण्याची सक्ती करीत असल्याचे समोर आले आहे.

केंद्र सरकारने विमान आणि रेल्वे प्रवाशांना ‘आरोग्य सेतू’ हे अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड करणे बंधनकारक नसल्याचे कर्नाटक उच्च न्यायालयात स्पष्ट केले. त्यानंतर देशातील बहुतांश विमानतळावर आरोग्य सेतू अ‍ॅपबद्दल विचारणा केली जात नाही. मात्र, मुंबई विमानतळावर अ‍ॅपचा आग्रह धरला जात आहे. त्यासाठी प्रवाशांवर दबाव टाकला जात आहे. स्व-घोषणापत्राच्या पर्यायाबद्दल प्रवाशांना सांगितले जात नाही. अ‍ॅपची सक्ती कशाच्या आधारावर केली जात आहे, याची माहिती देखील विमानतळ व्यवस्थापनाला नाही.

‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ची तपासणी करण्यात आपल्या कर्मचाऱ्यांची कोणतीही भूमिका नाही, असे इंडिगो एअरलाइन्सचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन व ब्रँड रेप्युटिशन संचालक सी. लिखा यांनी सांगितले.

यासंदर्भात विमानतळाच्या व्यवस्थापनातील सक्षम अधिकाऱ्यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी प्रवाशांना अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड करणे बंधनकारक आहे, असे सांगितले. त्यावर कर्नाटक उच्च न्यायालयात केंद्र सरकारने अ‍ॅप मोबाइलवर डाऊनलोड करणे अनिवार्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केल्याचे सांगितले, तर तो कर्नाटकपुरता निर्णय असेल, मुंबई आणि दिल्ली विमानतळावर आरोग्य सेतू अ‍ॅप आवश्यक आहे, असे उत्तर त्यांनी दिले.

टाळेबंदीनंतर विमान वाहतूक आणि रेल्वेसेवा सुरू झाल्यावर केंद्र सरकारने प्रवाशांना ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ बंधनकारक केले होते. याविरोधात कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. केंद्र सरकारने १२ जून २०२० ला प्रतिज्ञापत्र सादर केले. त्यात त्यांनी आरोग्य सेतू अ‍ॅप अनिवार्य नसून, त्याचा वापर ऐच्छिक आहे. स्व-घोषणापत्र सादर करून प्रवास केला जाऊ शकतो, अशी भूमिका मांडली. त्यानंतर रेल्वे आणि विमान प्रवासादरम्यान या ‘अ‍ॅप’ चा वापर बंद झाला. मात्र, मुंबई विमानतळावर अजूनही ‘अ‍ॅप’ प्रेम संपलेले नाही. महत्त्वाचे म्हणजे विमानतळ व्यवस्थापनाला ते ऐच्छिक आहे, याची कल्पनादेखील नाही.

यासंदर्भात मुंबई विमानतळ व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता त्यांनी न्यायालयाच्या आदेशाबाबत अनभिज्ञता दर्शवली. तसेच त्यांनी मुंबईवरील विमानतळावरून बाहेर प्रवास करण्यापूर्वी ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ फोनमध्ये डाऊनलोड करणे अनिवार्य आहे, असे सांगितले. एवढेच नव्हेतर देशातील इतर विमानतळांवर हाच नियम आहे, असा दावाही केला.

दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरचे वरिष्ठ विमानतळ संचालक आबीद रुही यांनी आरोग्य सेतू हे अ‍ॅप बंधनकारक नाही. प्रवाशाने स्व-घोषणापत्र भरून दिल्यानंतर प्रवास करता येतो, असे सांगितले.

बंधनकारक नाही, तरीही.. : नागरी उड्डाण मंत्रालयाच्या संकेतस्थळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ५ नोव्हेंबर २०२० ला काढलेल्या मार्गदर्शक सूचना आहेत. त्यातदेखील प्रवाशांना ‘आरोग्य सेतू अ‍ॅप’ बंधनकारक केले नाही. विमानतळावरील कर्मचारी प्रवाशांना हे ‘अ‍ॅप’ डाऊनलोड करण्याबाबत केवळ सल्ला देऊ शकतात, असे म्हटले आहे. मात्र, मुंबई विमानतळावर नागपूर ते मुंबई प्रवास करणाऱ्या प्रवाशांना या ‘अ‍ॅप’साठी आग्रह धरून प्रवाशांना विनाकारण त्रास देत आहेत. अलीकडे, मुंबई ते नागपूर असा प्रवास करणाऱ्यांनी झालेला प्रकार ‘लोकसत्ता’ला सांगितला.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Employees at the mumbai airport forcing passengers to download the arogya setu app zws
First published on: 11-01-2021 at 03:00 IST