लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून अंधेरी – कुर्ला मार्गावर फेरीवाल्यांची संख्या वाढली असून महानगरपालिकेने या मार्गावर तयार केलेल्या संपूर्ण पदपथावरच फेरीवाल्यांनी अतिक्रमण केले आहे. इतकेच नव्हे तर रस्त्यावरील दोन मार्गिकाही फेरीवाल्यांनी काबीज केल्या आहेत. फेरीवाल्यांनी या परिसरात पथाऱ्या पसरून नागरिकांचा रस्ता अडवला आहे. त्यामुळे येथील नागरिक कमालीचे संतप्त झाले आहेत.

मुंबईत सर्वत्र पुन्हा एकदा फेरीवाल्यांची संख्या वाढल्याची तक्रार नागरिक समाज माध्यमांवर करीत आहेत. गेल्या काही दिवसांपासून अंधेरी – कुर्ला मार्गावरील फेरीवाल्यांच्या संख्येत बेसुमार वाढ झाली आहे. स्थलांतरीत फेरीवाल्यांनीही मुंबईतील रस्ते व्यापले आहेत. याबाबत सामाजित कार्यकर्ते पिमेंटा गॉडफ्रे यांनी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्याकडे तक्रार केली आहे.

आणखी वाचा-रजोनिवृत्तीबाबतच्या जागरूतीसाठी महिलांनी पुढाकार घ्यावा, ९१ टक्के पुरुषांचे मत

महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांचा वरदहस्त असल्याशिवाय फेरीवाल्यांची संख्या इतकी वाढणे शक्य नाही, असा आरोप पिमेंटा गॉडफ्रे यांनी या पत्रात केला आहे. जे. बी. नगर येथे दर शनिवार बाजार भरतो. त्यावेळी फेरीवाल्यांच्या गर्दीतून वाट काढत चालणेही पादचाऱ्यांना मुश्कील होते. फेरीवाल्यांनी संपूर्ण पदपथ व्यापला असून आता अनेक फेरीवाल्यांनी रस्त्यावरही पथाऱ्या पसरल्या आहेत. त्यामुळे वस्तू विकत घेणाऱ्यांची गर्दीही वाढत आहे. यामुळे अंधेरी – कुर्ला मार्गावरील दोन मार्गिका वाहनांसाठी उरल्याच नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. या रस्त्यावरून एका वेळी एकच गाडी जाऊ शकेल इतकीच जागा उरली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फेरीवाल्यांची जास्त काळजी असल्याचा आरोप पिमेंटा यांनी केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने प्राधान्य कशाला द्यायचे ते ठरवावे. रस्ते पादचाऱ्यांसाठी आहेत की फेरीवाल्यांसाठी याचे धोरण ठरवावे, असेही ते म्हणाले.