New Yorker : ४५ वर्षांपासून मुंबईकरांच्या सेवेत असलेलं न्यू यॉर्कर हे शाकाहारी रेस्तराँ बंद होतं आहे. गुरुवारी या रेस्तराँचं शटर कायमचं खाली येणार आहे. मेक्सिकन मिक्स, इटालियन आणि भारतीय पद्धतीचे पदार्थ या रेस्तराँमध्ये मिळत होते. मात्र आता ११ सप्टेंबरपासून मुंबईकर या रेस्तराँमध्ये जाऊ शकणार नाहीत. सिझलिंग ब्राऊनी, सिझलर्स आणि चिझी नॅचोज हे खाण्यासाठी खवय्ये या रेस्तराँमध्ये गर्दी करायचे. मात्र कुटुंब समस्यांमुळे हे रेस्तराँ आता ४५ वर्षांनी मुंबईकरांना रामराम करतं आहे.
मालक रणबीर बत्रा यांनी काय सांगितलं?
न्यू यॉर्कर रेस्तराँचे मालक रणबीर बत्रा यांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं की रेस्तराँ बंद करण्याचा निर्णय घेणं आमच्यासाठी खरंच कठीण होतं. मी आणि माझे वडील टोनी बत्रा यांनी हा निर्णय घेतला. न्यू यॉर्कर हे रेस्तराँ १९८० मध्ये माझ्या आजीने सुरु केलं होतं. त्यांचं नाव ललिता बत्रा असं होतं. माझे वडील आणि माझी आजी हे दोघं मिळून रेस्तराँ चालवायचे. मी हे रेस्तराँ पाहता पाहताच मोठा झालो. या ठिकाणी तयार होणारे पदार्थ खास करुन ब्राऊनी आणि सिझलर्स हे लोकांना खूप आवडत होते. आता मात्र हे रेस्तराँ आम्ही बंद करत आहोत.
२००८ मध्ये मी या ठिकाणी आलो आणि मालक म्हणून काम करु लागलो-रणबीर बत्रा
मला जसं कळू लागलं तसं कॅश काऊंटर सांभाळत होतो. पण मी बघायचो ते म्हणजे आमचं सतत बिझी असलेलं किचन आणि वेटिंगमध्ये असलेली टेबल्स. मी २००८ मध्ये शिकागो येथून शिक्षण घेतल्यानंतर या रेस्तराँचा मालक झालो. मी अगदी माझ्या पायाभूत गोष्टीही या रेस्तराँकडून शिकलो आहे अशी आठवण रणबीर बत्रा यांनी सांगितली. आमच्या रेस्तराँमध्ये असलेला प्रत्येक कर्मचारी हा आमच्यासाठी घरातल्या माणसाप्रमाणेच होता. आता जड अंतःकरणाने आम्ही रेस्तराँ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
न्यू यॉर्कर रेस्तराँ का बंद होतं आहे?
रणबीर बत्रा यांना इंडियन एक्स्प्रेसने प्रश्न विचारला की इतक्या वर्षांपासून सेवेत असलेलं रेस्तराँ तुम्ही का बंद करत आहात त्यावर त्यांनी काही दुर्दैवी घटना घडल्या, शिवाय हा सगळा विषय कौटुंबिक आहे त्यामुळे मला फार तपशील देता येणार नाहीत. आम्ही मनावर दगड ठेवूनच हा निर्णय घेतला आहे. शिवाय कदाचित आम्ही डिलिव्हरी मॉडेल सुरु ठेवू. मात्र भविष्यातल्या योजना काय आहेत? याबाबत रणबीर यांनी मौन बाळगलं.
मुंबईकर हळहळले
न्यू यॉर्कर हे रेस्तराँ ४५ वर्षांपासून सेवेत होतं. मुंबईतल्या चर्नी रोड या ठिकाणी म्हणजेच साऊथ मुंबईत हे रेस्तराँ होतं. आता त्यांचं शटर कायमचं बंद होतं आहे. त्यामुळे अनेक मुंबईकर हळहळले आहेत. या ठिकाणी लोक रांग लावून सिझलर्स खायला यायचे असं एकाने सांगितलं. तसंच या ठिकाणी वाढदिवस साजरे व्हायचे, पार्टी व्हायच्या, गेट टू गेदर असायची. अंधेरी, पवई, बोरिवलीहून या ठिकाणी लोक यायचे. या रेस्तराँच्या अनेक आठवणी अनेकांकडे आहेत. त्यांच्या आठवणीतच आता हे रेस्तराँ असणार आहे.