मुंबई : अभियांत्रिकी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये ‘ऑटोफ्रिझ केलेल्या जागेवर विद्यार्थ्यांना प्रवे घेणे बंधनकारक आहे. मात्र नुकत्याच झालेल्या तीन फेऱ्यांमध्ये ५ हजार ७६२ विद्यार्थ्यांनी ऑटोफ्रिझ झालेल्या जागेवर प्रवेश न घेतल्याने ते चौथ्या म्हणजे मुक्त फेरीमध्ये फेकले गेले आहेत. या विद्यार्थ्यांना आता मिळेल त्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागणार आहे.

अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेला होत असलेला विलंब टाळण्यासाठी यंदा उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सीईटी प्रवेश प्रक्रियेच्या नियमात बदल केला. या बदलांनुसार पहिल्या फेरीत पहिल्या पसंतीचे, दुसऱ्या फेरीत एक ते तीन आणि तिसऱ्या फेरीत एक ते सहापर्यंतच्या पसंतीचे महाविद्यालय विद्यार्थ्याला मिळाल्यास त्या महाविद्यालयातील त्याची जागा ऑटोफ्रिझ होणार होती. म्हणजेच त्या महाविद्यालयात विद्यार्थ्याने प्रवेश घेणे अनिवार्य होते. विद्यार्थ्याने पसंतीक्रमातील या जागांवरील संस्थेत प्रवेशाची संधी मिळूनही प्रवेश न घेतल्यास तो विद्यार्थी पुढील नियमित फेऱ्यांमधून बाद होऊन थेट चौथ्या म्हणजेच मुक्त फेरीत समाविष्ट होणार होता. मुक्त फेरीत विद्यार्थ्याने भरलेल्या पसंतीक्रमापैकी कोणत्याही महाविद्यालयात त्याला प्रवेशाची संधी मिळाल्यास त्याला त्या महाविद्यालयात प्रवेश घेणे आता भाग असेल.

यंदा पहिल्या फेरीत १५ हजार ८५२ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीच्या महाविद्यालयामध्ये जागा मिळाली होती. त्यापैकी १५ हजार २९० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. यातील ५६२ विद्यार्थ्यांनी महाविद्यालय मिळूनही प्रवेश घेणे नाकारले. दुसऱ्या फेरीत १३ हजार ८६५ विद्यार्थ्यांना पहिल्या तीन पसंतीपैकी एका महाविद्यालयात जागा मिळाली. त्यातील ३ हजार २०१ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला तर तिसऱ्या फेरीत प्रवेश पहिल्या सहा पसंतीच्या महाविद्यालयांपैकी कोणत्याही एका महाविद्यालयात प्रवेश मिळालेल्या ९ हजार ७०६ पैकी ७ हजार ७०७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले. १ हजार ९९९ विद्यार्थ्यांनी प्रवेश नाकारला.

तीन फेऱ्यांमध्ये प्रवेश ऑटोफ्रिझ झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या ३९ हजार ४०३ एवढी होती. त्यापैकी ५ हजार ७६२ विद्यार्थ्यानी पसंतीच्या महाविद्यालयात प्रवेश न घेतल्याने आता हे विद्यार्थी मुक्त फेरीत जाणार आहेत. त्यांनी पसंती दिलेल्या महाविद्यालयांमधील जागा भरल्या असल्यास आता त्यांनी खालच्या क्रमावर पसंती दिलेल्या महाविद्यालयांपैकी कोणत्याही महाविद्यालयात त्यांचे नाव लागू शकते.

विद्यार्थ्यांनी प्राधान्यक्रम भरताना सारासार विचार करणे आवश्यक असते. तसेच एकदा प्राधान्यक्रमाच्या महाविद्यालयात जागा मिळाली, तर तेथे प्रवेश निश्चित केल्यास पसंतीच्या महाविद्यालयाची निवड केल्याचे समाधानही त्यांना मिळू शकते. पण आता मुक्त फेरीत मिळेल त्या महाविद्यालयात त्यांना प्रवेश घ्यावा लागेल, असे सीईटी कक्षाने स्पष्ट केले.

यंदा फेरीनिहाय प्रवेश

फेरी — अलॉटमेंट—-ऑटोफ्रिज—-प्रवेशित—रिक्त

पहिली—१,४४,७७६—१५,८५२—१५,२९०—५७६२

दुसरी—१,२९,५७७—१३,८६५—१०,६६४—३२०१

तिसरी—९८,०५५—९७०६—-७७०७—१९९९