गृहनिर्माण संस्था, चाळींमधील सार्वजनिक गणेशोत्सवात उत्साह कायम

मुंबई : सामाजिक अंतर पाळण्यासाठी रहिवाशांवर आलटूनपालटून आरती, नैवेद्याची जबाबदारी, ऑनलाइन गाण्याच्या भेंडय़ा-स्पर्धामधून रात्रीची जागरणे, इमारतींच्या आवारातच विसर्जनाची व्यवस्था अशा वातावरणात सध्या गृहनिर्माण संस्था अथवा चाळीतील सार्वजनिक व घरगुतीही गणेशोत्सव साजरा होत आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने एरवी घरामध्ये बंदिस्त असलेले शेजारी एकत्र जमतात. एकत्र आरती, स्पर्धा, गायनाचे कार्यक्र म, जागरण असे उत्साहाचे वातावरण यानिमित्ताने चाळी, सोसायटय़ांमध्ये दिसून येते. यंदा करोनामुळे हे वातावरण बदलले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा उत्सव साधेपणाने साजरा होत असताना तेथील उत्साहही काहीसा कमी झालेला दिसून येत आहे. मात्र, मुंबईतल्या गृहनिर्माण संस्थांमध्ये सामाजिक अंतराचे भान, साधेपणा आणि उत्साह दोन्ही एकत्र नांदत आहे.

दादरच्या ‘इंद्रवदन गृहनिर्माण संस्थे’ने कमी उंचीची शाडूची मूर्ती आणण्याची परंपरा यंदाही कायम ठेवली आहे. मात्र, विसर्जन वेगळ्या पद्धतीने होईल. संस्थेच्या आवारात सहा टब ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक विंगमधील किती घरगुती गणपतींचे कोणत्या दिवशी विसर्जन होईल, याची माहिती त्या त्या विंगचे प्रतिनिधी गोळा करत आहेत. विसर्जनासाठी प्रत्येक कु टुंबाला वेळ ठरवून दिली जाईल. संस्थेच्या गणपतीचे विसर्जनही याच टबांमध्ये होईल. सर्व कार्यक्रम ऑनलाइन घेतले जात आहेत. रविवारी लहान मुलांसाठी कथा, कविता यांच्या अभिवाचनाचा कार्यक्रम घेण्यात आला. एखाद्या मोकळ्या सदनिकेमध्ये भजन-कीर्तन करण्यासाठी कमीतकमी माणसे एकत्र येतात. त्याचे थेट प्रक्षेपण संस्थेच्या यूटय़ूब वाहिनीवरून के ले जाते. प्रत्येक जण आपापल्या घरात बसून कार्यक्रमाचा आनंद घेतो.

ठाण्याच्या ‘देवश्री पार्क  गृहनिर्माण संस्थे’ने तर आपल्या आवारातील जलतरण तलावालाच विसर्जनस्थळ बनवले. गळती लागल्याने हा तलाव सध्या वापरात नाही. येथील रहिवासी चिनू कबात्रा गेली तीन वर्षे समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करतात. त्यामुळे समुद्रात विसर्जन के ल्याने पर्यावरणाला होणाऱ्या हानीची त्यांना कल्पना आहे. त्यांनी जलतरण तलावात ताडपत्री टाकू न विसर्जनाची सोय करून दिली. यात संस्थेतील सर्व शाडूचे घरगुती गणपती विसर्जित होणार आहेत. विसर्जनाचे पाणी बागेतील झाडांना घातले जाईल आणि पाण्यातून काढलेल्या मातीचा वापर झाडे लावण्यासाठी के ला जाईल. दहिसरच्या ‘नंदधाम गृहनिर्माण संस्थे’ने लांबचा प्रवास टाळण्यासाठी जवळच्याच मूर्तिकारकडून शाडूची मूर्ती खरेदी के ली. वर्गणी, महाप्रसाद, पूजा, स्पर्धा सर्व रद्द के ले. आरती ‘गुगल मीट’वर के ली. ध्वनिवर्धकाचा वापर टाळला. अकराऐवजी दीड दिवसाने विसर्जन के ले. कांदिवलीतील ‘महावीरनगर एकतानगर’मध्ये अनेक चाळींचा मिळून एक गणपती असतो. यंदा मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात करण्यात आली आहे. सकाळ-संध्याकाळ दोनदा आरती होत असल्याने लोक आलटूनपालटून आरतीला येतात. गोराईतील ‘संजोबा गृहनिर्माण संस्थे’चा गणपती दरवर्षी चार फु टांचा असतो. या वर्षी संस्थेने दीड

फुटांची शाडूची मूर्ती आणली. आरती, नैवेद्यासाठी प्रत्येक कु टुंबाला एके क दिवस ठरवून दिला आहे.